सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:44 AM2020-03-13T11:44:11+5:302020-03-13T11:44:34+5:30

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात सायबर सेलला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Action against those who spread rumors on social media | सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास कारवाई होऊ शकते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात सायबर सेलला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत प्रशासनातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर चुकीची माहिती परवली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलीलाही कोरोना झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत सायबर सेलकडे तक्रार केली असून अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनीही जास्त पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शाळांना सध्या तरी सुटी देण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रकोप टाळण्यासाठी महामेट्रोतर्फे उपाययोजना
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याची गंभीर दखल महामेट्रोने घेतली असून आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या संबंधाने मेट्रो स्टेशन आणि इतरत्र पावले उचलली जात आहेत. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांकरिता प्रत्येक स्टेशनवर घोषणा करण्यात येत आहे. याअंतर्गत या रोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याकरिता आणि याची लागण होऊ नये म्हणून आवश्यक माहिती दिली जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाने कुठली काळजी घ्यावी आणि या रोगाची नेमकी लक्षणे काय व ती जाणवल्यास काय करायला हवे, याची माहितीही देण्यात येत आहे. केंद्र सरकारने प्रसारित केलेल्या उद्घोषणा स्टेशनवरून प्रसारित केल्या जात आहेत. याशिवाय माहिती देणारे फलक स्टेशनवर लावले जात आहेत. आॅरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोच्या ताफ्यातील सर्वच रेल्वे आणि स्टेशनच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते आहे. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनाही या रोगाच्या निमिताने अधिक सतर्क केले आहे. एकीकडे या सारख्या उपाययोजना होत असताना या रोगाची बाधा होऊ नये, याकरिता नागपूरकरांनी प्रयत्न करावेत, असे महामेट्रोने म्हटले आहे.

Web Title: Action against those who spread rumors on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.