रेती तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:59+5:302021-02-08T04:07:59+5:30
जगदीश जोशी नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ...

रेती तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
जगदीश जोशी
नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हुडकेश्वर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रेती तस्करांची वाहने पैसे घेऊन सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सांभाळताच अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानंतर कारवाई केल्यामुळे रेती तस्करी नियंत्रणात आली. काही दिवसांपासून पुन्हा रेती तस्करांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सूत जुळवून तस्करी सुरू केली. त्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी २ फेब्रुवारीला वाहतूक शाखेचे उपायुक्त, अजनी, सक्करदरा, कामठी विभागाचे निरीक्षक आणि कामठी, कळमना, पारडी, वाठोडा, नंदनवन, हुडकेश्वर तसेच बेलतरोडी ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारत त्वरीत रेती तस्करी बंद करण्याचे निर्देश दिले.
शहरात भंडारा मार्ग, उमरेड मार्ग आणि कोराडी मार्गाकडून रेती तस्करीची वाहने प्रवेश करतात. ते रोखण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतात. रेती तस्कर रात्रीच्या वेळी पोलिसांचे खिसे भरून शहरात प्रवेश करतात. तैनात केलेले पोलीस एका रात्रीत मालामाल होतात. तेथे काही धोका असल्यास रेती तस्करांना आधीच सूचना दिली जाते. त्यामुळे ते पर्यायी मार्गाने वाहन घेऊन येतात. उमरेड मार्गाच्या विहीरगाव येथील पॉईंटवर तैनात सहायक उपनिरीक्षक प्रेमकुमार आणि शिपाई अश्विन रेती तस्करांच्या वाहनांना शहरात प्रवेश देत होते. याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना मिळाली. त्यांनी प्रकरणाचा तपास केला. दोषी आढळल्यानंतर दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी रेती तस्करांशी जुळले आहेत. त्यांची थेट बोलणी होते. रेती तस्करांशी संपर्क करण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक मोबाईल असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
...........
दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची गरज
अवैध धंदे किंवा गैरकृत्यात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बदलीची कारवाई करण्यात येते. परंतु स्थानिक पातळीवर मजबुत पकड असल्यामुळे ही कारवाई पुरेशी नाही. बदली करण्यास काही अर्थ नसून निलंबन ठराविक कालावधीनंतर संपते. जानकारांच्या मते अशा कर्मचाºयांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करणे आवश्यक आहे. पुण्यातील चाकन ठाणे रेती तस्करीसाठी कुख्यात होते. तत्कालीन अधिक्षक संदिप पाटील यांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठवून रेती तस्करीतील तीन कर्मचाऱ्यांची धुळे येथे बदली केली होती. एका कर्मचाऱ्याने बदली स्विकारली तर दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की कोणीही शहरात अवैध धंदे चालवू शकत नाही. निलंबनाच्या कारवाईनंतर पोलिसांनी आपले कृत्य न थांबविल्यास भविष्यात ठोस पावले उचलण्यात येतील.
...............