नागपुरात उघड्यावर लघवी व थुंकणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:08 AM2019-10-12T01:08:03+5:302019-10-12T01:08:24+5:30

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Action against open urine and spit on 2384 persons in Nagpur | नागपुरात उघड्यावर लघवी व थुंकणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई

नागपुरात उघड्यावर लघवी व थुंकणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई

Next
ठळक मुद्देमनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : मनपा मुख्यालय परिसरातही ११० जणांकडून दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणाऱ्या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमधील पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथकाद्वारे अशा ११० जणांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे स्क्वॉड लिडर वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करुन शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.
उपद्रव शोध पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १०५२ जणांवर कारवाई करुन ९५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला तर उघड्यावर लघवी करणाऱ्या १३३२ जणांकडून २ लाख ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये एकूण २३८४ जणांकडून ३ लाख ५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हनुमान नगर, लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाई
उपद्र्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत सर्वाधिक कारवाई हनुमान नगर झोनमध्ये तर उघड्यावर लघवी करण्याबाबत लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. हनुमान नगर झोनमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सर्वाधिक २८९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये १५९, गांधीबाग झोनमध्ये ११७, धरमपेठ झोनमधील ११५, आसीनगर झोनमध्ये ९५, लकडगंज झोनमधील ९१, धंतोली झोनमध्ये ८७, मंगळवारी झोनमधील ६२, नेहरु नगर झोनमधील २७ व सतरंजीपुरा झोनमधील १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर व गांधीबाग झोनमध्ये उघड्यावर लघवी करणाºया प्रत्येकी २५५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या पाठोपाठ धंतोली झोनमध्ये २१०, मंगळवारी झोनमध्ये १४९, धरमपेठ व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी ११४, आसीनगर झोनमध्ये १०८, हनुमान नगर झोनमध्ये ७१, नेहरू नगर झोनमध्ये ४५ व सतरंजीपुरा झोनमध्ये ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
नागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातिप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि असे काही आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Web Title: Action against open urine and spit on 2384 persons in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.