‘पशुधन विकासाला’ रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:54+5:302021-04-20T04:09:54+5:30

बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी त्यांच्या गुरांची याेग्य काळजी ...

Acquisition of Vacancies for ‘Livestock Development’ | ‘पशुधन विकासाला’ रिक्त पदांचे ग्रहण

‘पशुधन विकासाला’ रिक्त पदांचे ग्रहण

बाबा टेकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी त्यांच्या गुरांची याेग्य काळजी जरी घेत असले तरी त्या गुरांना आराेग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने पशुधन विकास विभागाकडे साेपविली आहे. विशेष म्हणजे, सावनेर तालुक्यातील पशुधन विकास विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, या विभागातील २७ कर्मचाऱ्यांची कामे १० कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. पशुधन पर्यवेक्षकांची १२ पैकी ७ पदे रिक्त असल्याने गुरांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तसेच त्यांचा प्रभारी येत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांची जनावरे उपचारासाठी सावनेर शहरात आणावी लागतात किंवा खासगी डाॅक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करवून घ्यावे लागतात. सावनेर शहरातील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयातील सहायक आयुक्ताचे पद रिक्त आहे. तालुक्यातील खापा, केळवद, उमरी, तेलकामठी, तिष्टी, दहेगाव (रंगारी) व टाकळी येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ आहे. या दवाखान्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक नाहीत.

पिपळा (डाकबंगला) येथील पशुधन पर्यवेक्षक जुलै २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले असून, टेकाडीचे पर्यवेक्षकांची वर्षापूर्वी तर माळेगाव येथील पशुधन पर्यवेक्षकांची चार वर्षांपूर्वी रामटेक येथे बदली करण्यात आली. तरीही ते येथेच असून, नोव्हेंबर २०२१ मध्ये सेवानिवृत्त हाेणार आहेत. एका पशुधनविकास अधिकाऱ्याने किती जबाबदाऱ्या सांभाळाव्या आणि किती काम करावे, हाही संशाेधनाचा विषय झाला अहे. तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयातील पशुधनविकास अधिकारी डॉ. वैशाली अंजनकर यांच्याकडे सहायक आयुक्त सावनेर, पारशिवनी तसेच सावनेर तालुका नोडल ऑफिसर, संपूर्ण क्षेत्रातील पोस्टमार्टम, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र देणे, दोन्ही तालुक्याचे ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट देणे यासह सावनेरचा दवाखाना सांभाळणे आदी कामे आहेत. त्यामुळे त्यांना पशुपालकांचा विनाकारण रोष सहन करावा लागतो.

तालुक्यातील १२ पशुवैद्यकीय दवाखान्यात फक्त दाेन परिचर आहेत. यातील एक परिचर काेराेना पॉझिटिव्ह आहे. दाेन परिचरांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून, आता दवाखाना कुणी उघडावा, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अशास्थितीत पशुूचे संवर्धन कसे होईल, पशुपालकांना दिलासा कसा मिळेल, त्यांना त्यांच्या जनावरांसाठी चारा, वैद्यकीय सुविधा कशा मिळतील, असे नानाविध प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. पशुसवर्धन व दुग्धविकास मंत्र्यांनी आपल्या क्षेत्रातील या गंभीर समस्येकडे लक्ष देणे व या विभागाचे पुनरुज्जीवन करून अधिकारी, कर्मचारी, पशुपालक व शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

...

अशी आहेत रिक्त पदे

सावनेर तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयांतर्गत तालुक्यात १२ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये एकूण २७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, १७ पदे रिक्त असल्याने उर्वरित १० कर्मचारी कामाचा डाेलारा सांभाळत आहेत. या रिक्त पदांमध्ये एक सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), सात पशुपर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील पाचपैकी चार पशुपर्यवेक्षक येत्या काही दिवसात सेवानिवृत्त होणार असल्याने एकच पशुपर्यवेक्षक राहणार आहे. काही वरिष्ठ लिपिक सेवानिवृत्तीच्या मार्गावर असून, परिचरांची नऊ पदे रिक्त आहेत.

...

मोबाईल व्हॅन, शाेभेची वस्तू

सावनेर तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला नवीन मोबाईल व्हॅन मिळाली, तेव्हा क्षेत्रातील पशुपालकांना व पशुधनविकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तथा अन्य कर्मचाऱ्यांना आनंद झाला हाेता. गावातील पशुपालक व शेतकऱ्यांना चांगली सेवा त्यांच्या गावात मिळणार असल्याची आशा पल्लवीत झाली हाेती. मात्र, ही मोबाईल व्हॅन शोभेची वस्तू ठरली. या व्हॅनवर पशुधनविकास अधिकारी तथा अन्य आवश्यक कर्मचारी मिळाले नाही. हेही काम सावनेरच्या पशुधनविकास अधिकारी डॉ. वैशाली अंजनकर बघतात. काेराेना संक्रमणाची अतिरिक्त कामे, बैठका, अहवाल यामुळे त्या वैतागल्या आहेत.

Web Title: Acquisition of Vacancies for ‘Livestock Development’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.