The accused, who escaped from the police custody, was eventually found | पोलिसांच्या कोठडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला

पोलिसांच्या कोठडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला

ठळक मुद्देगुन्हे शाखेने बांधल्या मुसक्या : अजनी ठाण्यातून केले होते पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून अनेक पोलिसांसमोर पळून जाणारा आरोपी निखील चैतराम नंदनकर (वय २७, रा. भांडेवाडी) याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने बजावली.
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याच्या आरोपात तीन दिवसांपूर्वी आरोपी निखीलला पोलिसांनी अटक केली होती. त्याला अजनी ठाण्यातील लॉकमध्ये (कोठडी) टाकण्यात आले होते. घाईगडबडीत पोलिसांनी लॉकअप रूमला कुलूप लावण्याची तसदी घेतली नाही. एवढेच काय, कोठडीत टाकलेल्या आरोपी निखीलकडेही कुणी लक्ष दिले नाही. ती संधी साधून आरोपी निखील पोलीस ठाण्यातून पळून गेला. या घटनेमुळे अजनी पोलीस ठाण्याच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघाले होते. दरम्यान, अजनी पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचेही पोलीस निखीलचा शोध घेत होते. अखेर तो शनिवारी ग्रेट नाग रोडवरील जगदंबा सभागृहाजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हेशाखेच्या युनिट चारमधील पोलिसांनी सापळा लावला. तो सायंकाळी ५ च्या सुमारास सभागृहाजवळ दिसताच पोलिसांनी त्याला जेरबंद करून अजनी पोलिसांच्या हवाली केले.
हैदराबादला जाणार होता
तीन दिवसांपासून पोलिसांची झोप उडवून देणारा निखील हैदराबादला पळून जाणार होता. शनिवारी रात्रीच्या रेल्वेचे तिकीटही त्याने ऑनलाईन बुक केले होते. मात्र, हैदराबादला जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी कोठडीत पाठवले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान माने, सहायक निरीक्षक किरण चौगुले, दिलीप चंदन, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, एएसआय रमेश उमाठे, बट्टूलाल पांडे, अजय रोडे, नृसिंह दमाहे, नायक रवींद्र राऊत, सतीश निमजे, बबन राऊत, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशिष पाटील, ज्ञानेश्वर तांदुळकर, राजेंद्र तिवारी यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: The accused, who escaped from the police custody, was eventually found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.