आरोपींची जामिनावर मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:56+5:302021-03-14T04:08:56+5:30
उमरेड : मांढळ येथील गोदाम व एका घरी धाड टाकून सुगंधित तंबाखूच्या तस्करीचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने उजेडात आणले ...

आरोपींची जामिनावर मुक्तता
उमरेड : मांढळ येथील गोदाम व एका घरी धाड टाकून सुगंधित तंबाखूच्या तस्करीचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने उजेडात आणले होते. या प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना बुधवारी कुही येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रारंभी अटकेतील तीन आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली, अशी माहिती कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली. सोबतच फरार चवथा आरोपी न्यायालयात शरण आल्यानंतर त्याची सुद्धा शुक्रवारी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
सलीम ऊर्फ पप्पू सुभान शेख (३६), राजहंस रतन शिंदुरकर (४५) दोघेही रा. मांढळ, ता. कुही आणि अरुण ऊर्फ अर्जुन हरिश्चंद्र कटारिया (२९, रा. ड्रीम सिटी, उमरेड) आणि गिरजेश उर्फ अजय बंसल (३५) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यापैकी अजय बन्सल हा फरार होता. तो शुक्रवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
अर्जुन कटारिया आणि अजय बंसल हे सुमारे सात वर्षांपासून उमरेड येथे वास्तव्यास आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी सुगंधित तंबाखूला ब्रान्डेड पॅकींगसह विक्री करण्याचा धंदा सुरू केला. विदर्भातील बहुतांश भागात त्यांनी हेराफेरीचा धंदा करीत नेटवर्क जमविले होते. सोबतच अल्पावधीतच दोघांनीही प्रचंड माया जमविली.