त्या आरोपी मायलेकीस तीन लाख रुपये भरपाई
By Admin | Updated: May 18, 2015 02:41 IST2015-05-18T02:41:47+5:302015-05-18T02:41:47+5:30
पोलीस व सत्र न्यायालयाच्या कल्पनाविलासी भूमिकेमुळे शिक्षा भोगावी लागलेल्या मायलेकीस हायकोर्टाच्या आदेशान्वये तीन लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

त्या आरोपी मायलेकीस तीन लाख रुपये भरपाई
नागपूर : पोलीस व सत्र न्यायालयाच्या कल्पनाविलासी भूमिकेमुळे शिक्षा भोगावी लागलेल्या मायलेकीस हायकोर्टाच्या आदेशान्वये तीन लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही रक्कम दोघींमध्ये सारखी विभागली जाणार आहे.
सावित्रीबाई (४५) व रमा नारायण जोगदंड (१९) अशी आरोपींची नावे असून त्या दगड धानोरा, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर नवजात मुलाची हत्या केल्याचा आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ११ सप्टेंबर २००३ रोजी रमाने उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात मुलाला जन्म दिला होता. यानंतर ती कुणालाही न सांगता मुलाला घेऊन निघून गेली. काही दिवसांनी जवळच्या नदीत एका नवजात मुलाचे शव आढळून आले. प्राथमिक तपासानंतर पोफळी पोलिसांनी सावित्रीबाई व रमाला अटक केली होती. २००६ मध्ये सत्र न्यायालयाने दोघींनाही भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप ठोठावली होती. रमाने तिच्या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले होते. उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. सावित्रीबाईने अपील करण्यासाठी अमरावती येथील वऱ्हाड संस्थेला पत्र लिहिले होते. परंतु, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. नागपूर कारागृहात स्थानांतरित झाल्यानंतर तिच्यावतीने अपील दाखल करण्यात आले. तत्पूर्वी ती १२ वर्षांपासून कारागृहात होती.
अपीलांवर सुनावणी करताना दोन्ही आरोपींवर अन्याय झाल्याचे व त्यांना कोणतेही पुरावे नसताना शिक्षा सुनावण्यात आल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश शासनास दिले होते. शासनाने त्याला मान्यता दिली आहे. दोघींंच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात ही रक्कम जमा करण्याची जबाबदारी नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)