पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार
By Admin | Updated: February 22, 2015 02:38 IST2015-02-22T02:38:34+5:302015-02-22T02:38:34+5:30
वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार
नागपूर : वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे घडली. यानंतर नागपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
राजेश तुळशीराम राऊत (३०) रा. असे आरोपीचे नाव आहे. विनयभंग प्रकरणात त्याला जलालखेडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच तपास केल्यावर त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जलालखेडा पोलिसांनी त्याला पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी मेडिकलमध्ये नेले. तेथे त्याच्यासोबत पोलीस असताना त्याने नजर चुकवून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. याबाबत मेडिकल बूथला सूचना देण्यात आली. आरोपी हा नागपूर शहरातून बाहेर जाण्याची शक्यता असल्याने नागपूर ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. कोंढाळी पोलिसांनी कोंढाळी - काटोल मार्गावर तसेच नागपूर - अमरावती मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी केली. यासोबतच सावनेर, काटोल, रामटेक, उमरेड, बुटीबोरी, कन्हान, कामठी पोलिसांनीही नाकाबंदी केली. अत्याचार प्रकरणाचा तपास जलालखेडा पोलीस करीत असून त्यांना माहिती मिळताच ठाणेदार पीतांबर जाधव हे रात्री मेडिकलमध्ये दाखल झाले. (जिल्हा प्रतिनिधी)