खुनातील आरोपींना थेट ‘एमसीआर’
By Admin | Updated: October 11, 2015 03:23 IST2015-10-11T03:23:40+5:302015-10-11T03:23:40+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथील नबाब अन्वर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी ...

खुनातील आरोपींना थेट ‘एमसीआर’
नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर येथील नबाब अन्वर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने (जेएमएफसी) दोन आरोपींना थेट सुनावलेला न्यायालयीन कोठडी रिमांड अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने रद्द करून दोन्ही आरोपींना १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शेख वसीम ऊर्फ छोटा वसीम (२५) आणि बासीद पटेल दोन्ही रा. शांतिनगर, अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही शेख वसीम ऊर्फ चिऱ्या शेख अफझल याच्या टोळीतील सदस्य आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने २८ एप्रिल २०१५ रोजी शेख वसीम ऊर्फ चिऱ्या याच्यासह टोळीतील सर्व पंधरा आरोपी निर्दोष सुटले होते.
शांतिनगर भागात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी शेख वसीम आणि तिरुपती भोगे यांच्या टोळ्यांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो. १७ आॅगस्ट २०१३ रोजी या दोन्ही टोळ्यांनी शांतिनगर भागात उच्छाद घालून एकमेकांवर गोळीबार आणि सशस्त्र हल्ला केला होता. त्यावेळी दोन्ही टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करून दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्यांना आणि सदस्यांना अटक करण्यात आली होती. शेख वसीम हा आपल्या टोळीसह निर्दोष सुटला परंतु भोगे आणि त्याची टोळी वेगवेगळ्या गुन्ह्यात अद्याप कारागृहात आहे.
नबाब अन्वर हा तिरुपती भोगेच्या टोळीला आपल्या टोळीची माहिती देऊन स्वत:चे वर्चस्व निर्माण करीत असल्याच्या संशयावरून शेख वसीमच्या टोळीने त्याचे २२ सप्टेंबर रोजी शांतिनगर भागातून अपहरण करून कळमन्यातील पावनगाव शिवारात नेले होते. या ठिकाणी त्याचा खून करून कामठी भागातील एका कालव्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. २७ रोजी मृतदेह आढळला होता. कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची सुरुवात शांतिनगर येथून प्रारंभ होत असल्याने प्रकरण लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
३० सप्टेंबर रोजी लकडगंज पोलिसांनी या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते आणि पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. परंतु ती नामंजूर करण्यात आली होती. त्यामुळे सरकार पक्षाने सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दखल केला होता. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनिता खोब्रागडे यांनी काम पाहिले. एपीआय धनराज नीळे आणि फौजदार आनलदास हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)