कळमन्यातील कुख्यात गुंडाच्या खुनातून आरोपी निर्दोष
By Admin | Updated: July 29, 2015 03:04 IST2015-07-29T03:04:57+5:302015-07-29T03:04:57+5:30
कळमना गुलशननगर भागातील कुख्यात गुंड युवराज ऊर्फ बाल्या जयराम रहांगडाले याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र ...

कळमन्यातील कुख्यात गुंडाच्या खुनातून आरोपी निर्दोष
नागपूर : कळमना गुलशननगर भागातील कुख्यात गुंड युवराज ऊर्फ बाल्या जयराम रहांगडाले याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली. सरकार पक्ष आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे, न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
योगेंद्र ऊर्फ गोलू मंगल पाल (३१) रा. गुलशननगर शितला माता मंदिरजवळ, असे आरोपीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करायचा. मृत बाल्या रहांगडाले हा खतरनाक गुन्हेगार होता. त्याच्या नावाची मोठी दहशत होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, २१ जून २०१४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोलू पाल हा मोबाईल रिचार्जसाठी शितला माता मंदिर चौकात गेला होता. तेथे बाल्या रहांगडाले याने गोलूला गाठले होते. मोहल्ल्यात मंडईचे आयोजन करण्यावरून बाल्याने गोलूसोबत भांडण उकरून काढले होते. दोघांमध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांना थापडा मारल्या होत्या.
गोलू पालने तडक घरी जाऊन मिरची पावडर आणि चाकू आणला होता. त्याने बाल्या रहांगडाले याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून चाकूने सपासप अनेक वार केले होते. बाल्यानेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु गोलू हा बाल्याने केलेला चाकूचा वार हुकवीत होता. चेहऱ्यावर, गळ्यावर अनेक वार करून गोलूने त्याचा जागीच खून केला होता. लागलीच गोलू हा रक्ताने माखलेल्या शस्त्रासह कळमना पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याने घडलेली घटना पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र राऊत याला सांगितली होती. त्यावरून गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल तयार करण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सहा साक्षीदारांनी सरकार पक्षाला कोणतीही मदत केली नाही.
सरकारी वकिलाने त्यांची उलट तपासणी घेतली परंतु आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे प्राप्त करू शकले नाहीत. परिणामी न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.
न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. सी. आर. ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनीता खोब्रागडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)