मृत्युपूर्व बयानातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष
By Admin | Updated: March 27, 2015 01:56 IST2015-03-27T01:56:24+5:302015-03-27T01:56:24+5:30
केवळ त्रुटींमुळे मृत्युपूर्व बयान अविश्वासार्ह ठरून नंदनवन झोपडपट्टीतील एका तरुणाच्या खुनातील तिन्ही आरोपींना संशयाचा लाभ मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

मृत्युपूर्व बयानातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष
नागपूर : केवळ त्रुटींमुळे मृत्युपूर्व बयान अविश्वासार्ह ठरून नंदनवन झोपडपट्टीतील एका तरुणाच्या खुनातील तिन्ही आरोपींना संशयाचा लाभ मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला.
अमित राजेंद्र शेंडे (२५), असे मृताचे नाव होते. तो नंदनवन झोपडपट्टीतील रहिवासी होता. राकेश नागदिवे, गोलू ऊर्फ सौरभ डांगे आणि मोनू सोमकुंवर सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी, अशी आरोपींची नावे आहेत.
सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, अमित हा आपला मित्र कार्तिक वानखेडे याच्यासोबत १५ डिसेंबर २०१२ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपला नातेवाईक मंगेश बारसागडे याच्या घराकडे जात असताना या तिन्ही आरोपींनी त्याला थांबवले. गुप्तीने वार करून आणि हातबुक्कीने मारहाण करून आरोपी पळून गेले होते. जखमी अवस्थेत अमित हा बारसागडेच्या घरी लपून बसला होता. रात्री २ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलिसांनी बारसागडेचे घर गाठून जखमी अमितला मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल केले होते.
या प्रकरणाचे तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील तिवारी आणि उपनिरीक्षक एस.बी. बोबडे यांनी अमितचे मृत्युपूर्व बयान नोंदवले होते. राकेशने गुप्ती आणि अन्य दोघांनी हातबुक्कीने मारल्याचे त्याने सांगितले होते. हे सर्व जण आपणास शिवीगाळ करीत होते. शिवीगाळ का करता, असे विचारले असता त्यांनी आपणावर हल्ला केला, असेही त्याने मृत्युपूर्व बयानात सांगितले होते.
बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले की, मृत्युपूर्व बयानासाठी दंडाधिकारी किंवा तहसीलदाराला पत्र देऊन पाचारण करण्यात आले नव्हते. तो बयान देण्यास सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते.
त्यावर बयान नोंदवण्याची वेळ २.४० आणि बयान संपल्याची वेळही २.४०, अशी नोंदवण्यात आली होती. तपास अधिकारी जयस्वाल यांनी आपल्या साक्षीत अमितला इस्पितळात दाखल करण्याची वेळ ३.३०, अशी सांगितली होती. ‘स्टेशन डायरी’वरही हीच नोंद करण्यात आली होती.
बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य ठरवून संशयाचा लाभ देत न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. राम मासूरके, अॅड. चेतन ठाकूर आणि अॅड. खंडारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)