आरोपीस सात वर्षे कारावास
By Admin | Updated: July 17, 2015 03:26 IST2015-07-17T03:26:09+5:302015-07-17T03:26:09+5:30
नोकरीचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या

आरोपीस सात वर्षे कारावास
नोकरीचे आमिष दाखवून अपहरण, बलात्कार :
दंडाच्या रकमेतून पीडितास १० हजार रुपये देण्याचे आदेश
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार ५०० रुपयाचा दंड सुनावला. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितास नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
प्रकाश नारायण निंबाळकर (५०), असे आरोपीचे नाव असून तो कळमेश्वर तहसीलच्या बोरगाव धुरखेडा येथील रहिवासी आहे. दुर्दैवी मुलगी ही खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. वडील बकऱ्या चारण्याचे काम करतात. पीडित मुलगी नवव्या वर्गापर्यंत शिकलेली आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे दोन वर्षांपूर्वीच तिने शिक्षण सोडले. कुटुंबाला हातभार म्हणून ती शेतावर काम करायची.
८ मार्च २०१३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पीडित मुलीचे वडील घरी असताना नराधम प्रकाश निंबाळकर हा मोटरसायकलने त्यांच्या घरी गेला होता. त्याला घरचे कोणीही ओळखत नव्हते. त्याने मुलीबाबत चौकशी करून तिला चांगली नोकरी मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यावेळी पीडित मुलगी एका शेतावर काम करीत होती. त्याच्यावर विश्वास ठेवून वडिलाने या इसमाला शेतावर नेले होते. सोबत आधारकार्ड घेऊन सावनेरला जावे लागेल, असे त्याने सांगितले होते. मुलीला सायंकाळपर्यंत घरी सोडून देतो, असे सांगून हा इसम मुलीला मोटरसायकलवर डबलसिट बसवून घेऊन गेला होता. त्यानंतर सायंकाळचे ७ वाजूनही मुलगी परतली नसल्याने वडिलाने खापा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६६ ए कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
आरोपीने दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलीला वाकी बस थांब्यावर सोडून दिले होते. तेथे तिला तिच्याच गावचा एक मुलगा भेटला होता. त्याला तिने आपली संपूर्ण कर्मकहाणी सांगितली होती. घटनेच्या दिवशी या नराधमाने तिला सावनेरच्या तहसील कार्यालयात नेले होते. पाच मिनिटातच तो कार्यालयातून बाहेर पडला होता. साहेब जागेवर नसल्याचे त्याने या मुलीला सांगितले होते. हा आरोपी तिला कोराडी मार्गे नागपूर येथे घेऊन आला होता. त्यानंतर त्याने या मुलीला बोरगाव-सिल्लोरी मार्गावर नेले होते. त्यानंतर त्याने तिला सुनसान ठिकाणी नेले. त्यावेळी रात्र झाली होती. एका शेतातील झोपडीत नेऊन त्याने या मुलीवर दोन वेळा बलात्कार केला होता. त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी मुलीचे बयाण नोंदवून गुन्ह्यात भादंविच्या ३७६, ५०६ (२) ने वाढ केली होती. बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला लागलीच अटक करण्यात आली होती. खापा पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३७६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम ३, ४ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, भादंविच्या ३६३ कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, ५०६ कलमांतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी तर आरोपीच्या वतीने अॅड. आर. पी. खापर्डे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)