आरोपीला हायकोर्टात जामीन
By Admin | Updated: November 13, 2015 02:49 IST2015-11-13T02:49:32+5:302015-11-13T02:49:32+5:30
भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला.

आरोपीला हायकोर्टात जामीन
नागपूर : भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला.
जुल्फेकार ऊर्फ छोटू गनी, असे आरोपीचे नाव आहे. धरम दावणे, असे मृताचे नाव होते.
प्रकरण असे की, मोठी रक्कम वसूल करण्याच्या हेतूतून गोंदिया येथीलच योगेशकुमार मस्के याच्या मालकीच्या भूखंडावर गनी याने अवैधरीत्या कब्जा केला होता. या भूखंडावर ‘नॉट फॉर सेल’चा फलक उभारला होता. योगेशकुमार याने आपल्या भूखंडावरील गुंडांचा ताबा हटवण्यासाठी धरम दावणे याची मदत घेतली होती. दावणे हा आपल्या कामात अडथळा आणि आहे म्हणून त्याच्या खुनाचा कट रचण्यात आला होता.
९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धरम हा आपला मित्र विशाल गजभिये याच्यासोबत शक्ती चौक येथे बोलत असताना गनीने धरमवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. गनीसोबतच्या साथीदारांनी विविध शस्त्रांनी धरमवर हल्ला केला होता. हल्ल्यात विशाल गजभियेही जखमी झाला होता. गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात गनीसह १५ जणांविरुद्ध ३०२,१४९, ३०७, १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गनीचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने अॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. डागा यांनी उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, या प्रकरणातील सर्वच आरोपींचा जामीन झालेला आहे. उत्तरीय तपासणी अहवालानुसार धरम दावणेचा मृत्यू गोळी लागून झाला नाही. गोळी त्याच्या बरगड्यात लागली होती. ‘हेड इन्ज्युरी टू ब्रेन पार्ट अँड लॉस आॅफ ब्लड’, असे मृत्यूचे कारण अहवालात नमूद आहे. आरोपी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने गनीला जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)