आरोपीला १० वर्षे कारावास

By Admin | Updated: June 24, 2017 02:41 IST2017-06-24T02:41:45+5:302017-06-24T02:41:45+5:30

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सात वर्षीय बालिकेसोबत विकृत कृत्य करणाऱ्या मानलेल्या मामाला

The accused gets 10 years imprisonment | आरोपीला १० वर्षे कारावास

आरोपीला १० वर्षे कारावास

सत्र न्यायालय : बालिकेसोबत विकृत कृत्याचे प्रकरण सत्र न्यायालय : बालिकेसोबत विकृत कृत्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सात वर्षीय बालिकेसोबत विकृत कृत्य करणाऱ्या मानलेल्या मामाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आदेशाच्या एक वर्षानंतर आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये पीडित मुलीला तिच्या आईच्या मार्फत देण्यात यावे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५७ ए(३) मधील तरतुदीनुसार अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी शिफारस करण्यात आली आहे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
संदीप ऊर्फ सोनू हरि वर्मा (३०), असे आरोपीचे नाव असून तो सुरेंद्रगड येथील रहिवासी आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी ही आरोपीला मामा म्हणायची. ६ मे २०१६ रोजी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीची आई सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या कामावर निघून गेली होती. दुपारी २ वाजता ती कामावरून घरी परतली तेव्हा तिची मुलगी नजरेस पडली नाही. तिने शोध घेतला असता शेजारी महिलेने तुमची मुलगी बऱ्याच वेळपासून सोनू वर्माच्या घरी असल्याची खबर दिली होती.
तत्पूर्वी आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी विकृत चाळे केले होते. त्यानंतर तिला दुकानातून खर्रा आणण्यासाठी पैसे दिले होते, शिवाय पाच रुपये आगाऊ दिले होते. हे पैसे तू ठेवून घे, असे तो तिला म्हणाला होता. मुलगी खर्रा घेऊन सोनूच्या घरी गेली असता त्याने दार बंद करून तिच्यासोबत विकृत कृत्य केले होते.
दरम्यान कामावरून परतलेल्या आईने सोनू वर्माच्या घरी जाऊन आवाज दिला आणि दार उघडायला लावले असता आतून मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता, आरोपी हा दार उघडत नव्हता. दाराला जोरजोराने धक्के मारल्यानंतर दार उघडल्या गेले होते. मुलीने रडत घडलेली घटना सांगताच घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सोनूला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या ३७६(२)(१) आणि लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. कन्नाके यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

अशी आहे शिक्षा
न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी सोनू वर्मा याला न्यायालयाने भादंविच्या ३७६(२)(१) आणि पोक्सोच्या कलम ६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, भादंविच्या ३५४ आणि पोक्सोच्या कलम १० कलमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, भादंविच्या ४५० कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या तिन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.
न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे आणि आरोपीच्या वतीने अ‍ॅड. रेखा गोडबोले यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक एस. आर. शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल सुनील कडू यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

 

Web Title: The accused gets 10 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.