गीतांजली चाैकातील गोळीबाराचे आरोपी मध्य प्रदेशात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:36+5:302021-08-12T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी सकाळी मोहसीन अहमद मुस्ताक अहमद (वय २६) नामक गुन्हेगारावर गोळी झाडून त्याची हत्या ...

गीतांजली चाैकातील गोळीबाराचे आरोपी मध्य प्रदेशात जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सकाळी मोहसीन अहमद मुस्ताक अहमद (वय २६) नामक गुन्हेगारावर गोळी झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या बांधण्यात तहसील पोलिसांनी मंगळवारी यश मिळवले. कामरान वकील अहमद शेख आणि मुस्तफिक ऊर्फ मुस्फिक शकील खान (वय ३४, रजा टाऊन, कपिलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुस्फिक हा या गुन्ह्याचा सूत्रधार आहे. तो आणि मोहसीन हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. अवैध धंद्यांसोबतच ते दोघेही ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आहेत. गेल्या वर्षी मोहसीनच्या मित्रांनी आरोपींशी संबंधित एका तरुणावर गोळी झाडली होती. त्यात तो बचावला होता. याप्रकरणी तहसील ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आरोपींकडून त्याचा तसाच बदला घेण्याचा प्रयत्न झाला. पाच दिवसांपूर्वी आरोपी मुस्फिक आणि मोहसीनच्या साथीदारांमध्ये वाद झाल्याने ते टोकाला गेले. या पार्श्वभूमीवर, मोहसीन त्याच्या काही मित्रांसोबत रविवारी ताजबागमध्ये गेला होता. तेथे मुस्फिकही होता. नजरेवर नजर पडताच पहाटे ३ च्या सुमारास या दोघांमध्ये तेथे वाद झाला. तो कसाबसा सुटला. त्यानंतर आरोपी मुस्फिकने मोहसीनचा स्पॉट लावण्याची तयारी केली. सोमवारी भल्या सकाळी मोहसीन ताजबागमधून बजेरियाकडे आला. आरोपी त्याच्या मागावरच होते; परंतु त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर मोहसीनला जावेद नामक मित्राने सकाळी ५ च्या सुमारास गीतांजली चाैकात एका पानटपरीजवळ सोडले. ते पाहून आरोपी मुस्फिक आणि अल्ताफ त्याच्याकडे धावले आणि त्यांनी मोहसीनवर गोळी झाडली. ती मोहसीनच्या पायाला लागल्याने तो खाली पडला. यावेळी गीतांजली चाैकात बऱ्यापैकी गर्दी होती. त्यामुळे आरडाओरड झाल्याने आरोपी कारमध्ये बसून पळून गेले. या गोळीबाराच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. मोहसीन आणि त्याच्या मित्रांनी आरोपींची नावे सांगितल्यानंतर पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी आपापल्या पथकाकडून समांतर तपास सुरू केला. आरोपी मुस्फिक छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे लपून असल्याचे कळताच तहसीलच ठाणेदार जयेश भांडारकर यांच्या पथकाने तेथे जाऊन मुस्फिक आणि कामरानच्या मुसक्या बांधल्या. त्यांचे साथीदार मात्र, फरार आहेत. आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि कार जप्त केली.
---आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल
आरोपी मुस्फिक हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी सदर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. ४५ लाखांच्या चोरीसह अन्य गंभीर गुन्ह्यातही तो आरोपी आहे. तर, मोहसीन हासुद्धा गुन्हेगार असून मुस्फिकसोबत त्याचा पहिला वाद २०१५ ला झाला होता. दरम्यान, अटक केल्यापासून आरोपी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत या प्रकरणातील वास्तव उघड होईल, असे पोलीस अधिकारी सांगतात.
----