खुनातील आरोपीस अटक
By Admin | Updated: March 16, 2017 02:24 IST2017-03-16T02:24:10+5:302017-03-16T02:24:10+5:30
क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि एकाने तरुणाच्या डोक्यावर उभारीने वार करून त्याचा खून केला.

खुनातील आरोपीस अटक
विश्वास थेरे खूनप्रकरण : मध्यवर्ती कारागृहात रवानगी
भिवापूर : क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि एकाने तरुणाच्या डोक्यावर उभारीने वार करून त्याचा खून केला. यातील आरोपीस पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटात अटक केली. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भिवापुरातील करंजी भागात घडली. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने, त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
विश्वास रामकृष्ण थेरे (३२, रा. देवाळकर मोहल्ला, भिवापूर) असे मृताचे तर गोपाल सोमाजी दडमल (३८, रा. भिवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. करंजी भागात दोघांची भेट झाली आणि क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी गोपाल हा दारू प्यायलेला होता. गोपालने उभारी घेऊन विश्वासच्या डोक्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गोपाल पळून गेला होता. माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र दुबे यांनी घटनास्थळ गाठले व जखमी विश्वासला ग्रामीण रुग्णालयात नेले.
दुसरीकडे, पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी गोपालचा शोध सुरू केला. तो भिवापूरपासून पाच कि.मी. अंतरावरील शेतातील मंदिरात लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शेत गाठून त्याला अटक केली. त्याच्याकडून त्याने वार करण्यासाठी वापरलेली उभारी व इतर साहित्य जप्त केले. त्याला सोमवारी भिवापूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. खलाने यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुरुवातीला त्याला एक दिवसाची (मंगळवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)