सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:28+5:302020-12-25T04:07:28+5:30
नागपूर : महिलेच्या खून प्रकरणामध्ये भंडारा सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपीला जन्मठेप
नागपूर : महिलेच्या खून प्रकरणामध्ये भंडारा सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
वीरेंद्र रमेश फुले (२८) असे आरोपीचे नाव असून तो तुमसर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव ललिताबाई होते. ही घटना २८ मार्च २००८ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली होती. प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये किशोर मनिराम धुर्वे व मुरली मनिराम धुर्वे यांचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींनी ललिताबाईवर तलवारी व चाकूने वार करून तिचा खून केला. ७ जानेवारी २०१६ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने किशोर धुर्वे व मुरली धुर्वे यांना जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली तर, फुलेला पुराव्यांअभावी निर्दोष सोडले होते. त्यामुळे फुलेसंदर्भातील निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता ते अपील मंजूर करून फुलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
-----------
मुरलीचे अपील फेटाळले
कासुंबी, ता. वाराशिवनी, जि. बालाघाट येथील मूळ रहिवासी असलेल्या मुरली धुर्वेने त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून मुरलीची शिक्षा कायम ठेवली.