कागदोपत्री सहकारी संस्थांचा ‘हिशेब’
By Admin | Updated: July 17, 2015 03:26 IST2015-07-17T03:26:54+5:302015-07-17T03:26:54+5:30
केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे.

कागदोपत्री सहकारी संस्थांचा ‘हिशेब’
कारवाई होणार : विशेष सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात
नागपूर : केवळ कागदोपत्री चालत असलेल्या सहकारी संस्थांचा शोध घेऊन त्या तातडीने बंद करण्यासाठी सहकार विभागाने कडक पाऊल उचलले आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत थेट गावात जाऊन नागपूर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची ही विशेष मोहीम गेल्या १ जुलैपासून सुरु झाली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काहीतरी उद्देश ठेवून अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यांचा उद्देश सफल झाल्यानंतर संचालक व संस्थापकांनी संस्थेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गृहनिर्माण, उद्योग, बेरोजगार, ग्राहक या नावाने स्थापन झालेल्या संस्था नेमक्या कुठे आहेत, याचा शोध घेणेही अवघड झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये सहकार विभागाने या संस्थांना लेखा परीक्षण करून घेण्याच्या सूचना देऊनही परीक्षण केले नाही. तसेच संस्था आॅनलाईन करताना अनेक संस्थांची माहिती उपलब्ध नाही. काही संस्था कागदोपत्रीच आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सहकार विभागाचे अधिकारी, तसेच लेखा परीक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावागावात जाऊन नोंदणी झालेल्या सर्व संस्थांची माहिती घेणार आहेत. ज्या संस्था सुरू आहेत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. ज्या संस्थांचा ठावठिकाणा नाही, त्या संस्था तातडीने बंद करण्यात येतील, असेही भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)