नॅकच्या मानांकनात ४० टक्के महाविद्यालये ग्रामीण महाराष्ट्रातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:25+5:302021-09-23T04:09:25+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. मात्र, गाव व ...

According to NAC, 40% of the colleges are in rural Maharashtra | नॅकच्या मानांकनात ४० टक्के महाविद्यालये ग्रामीण महाराष्ट्रातील

नॅकच्या मानांकनात ४० टक्के महाविद्यालये ग्रामीण महाराष्ट्रातील

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. मात्र, गाव व तालुका पातळीवरील महाविद्यालयांचा दर्जादेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. नॅकच्या (नॅशनल असेसमेन्ट अँड ॲक्रेडिटेशन कॉन्सिल) मानांकनात शहरी महाविद्यालयांना ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांनी चांगलीच टक्कर दिली आहे. नॅकचा विविध दर्जा असलेल्यांपैकी ४० टक्के महाविद्यालये ग्रामीण महाराष्ट्रातील आहेत. ‘नॅक’तर्फे जारी करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्यातील मूल्यांकन झालेल्या उच्च शिक्षण संस्थांचे राज्यस्तरीय विश्लेषण' या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

२०२० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ४ हजार ७८० महाविद्यालये होती. यापैकी १ हजार ७११ महाविद्यालयांनाच नॅकचे मानांकन होते. नॅकने यापैकी १ हजार ३६७ महाविद्यालयांचे विश्लेषण केले. यानुसार ४३.८९ टक्के महाविद्यालये ही शहरी भागातील होती, तर ४०.८२ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागातील होती. १२.३६ महाविद्यालये ही निमशहरी भागातील होती, तर आदिवासी भागातील महाविद्यालयांची टक्केवारी केवळ २.९३ टक्के इतकीच होती.

औरंगाबाद-अमरावतीत ग्रामीणचीच बाजी

विभागनिहाय तुलनात्मक आकडेवारीनुसार औरंगाबाद व अमरावती विभागातील नॅकचे मानांकन असलेली अर्ध्याहून अधिक महाविद्यालये ग्रामीण भागातील आहेत. औरंगाबादमध्ये ही टक्केवारी ५६.५४ टक्के, तर अमरावतीत ५७.५० टक्के इतकी आहे. कोकण विभागात सर्वांत कमी २६.१४ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागातील आहेत.

अवघ्या ६ टक्के महिला महाविद्यालयांचा समावेश

नॅकचे मानांकन लाभलेल्यांमध्ये महिला महाविद्यालयांची संख्या फारच कमी आहे. एकूण महाविद्यालयांत महिला महाविद्यालयांची टक्केवारी ६.३६ टक्के इतकीच होती.. नागपुरात सर्वाधिक ७.७३ टक्के महिला महाविद्यालयांना मानांकन होते, तर औरंगाबाद विभागात हेच प्रमाण ४.३० टक्के होते.

मुंबईपेक्षा पुण्यात जास्त मानांकित महाविद्यालये

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार एकूण मानांकित महाविद्यालयांपैकी १७.१ टक्के पुण्यातील होती, तर ९.५ टक्के मुंबईतील होती. नागपुरातील टक्केवारी ८ टक्के, तर नाशिकची ४.९ टक्के होती.

विभागनिहाय मानांकित महाविद्यालये

विभाग – शहरी महाविद्यालये- ग्रामीण महाविद्यालये – निमशहरी महाविद्यालये

अमरावती – २१.६७ % - ५७.५० % - १५.८३ %

औरंगाबाद – २३.१२ % - ५६.४५ % - १८.८२ %

कोकण – ६२.१२ % - २६.१४ % - १०.२३ %

नागपूर – ४२.८७ % - ४४.८५ % - ७.७२ %

नाशिक – ३१.६६ % - ४७.७४ % - १२.५६ %

पुणे – ५४.७० % - ३२.९२ % - ११.८८ %

नॅकच्या मानांकनातील टॉप पाच जिल्हे

जिल्हा - मानांकित महाविद्यालयांची टक्केवारी

पुणे - १७.१ %

मुंबई - ९.५ टक्के

नागपूर - ८.० टक्के

नाशिक - ४.९ टक्के

कोल्हापूर - ४.१ टक्के

Web Title: According to NAC, 40% of the colleges are in rural Maharashtra