अपघाताचे प्रमाण २७ टक्के तर मृत्यूचे ३२ टक्क्यांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST2021-01-16T04:11:52+5:302021-01-16T04:11:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरातील रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. रस्ता सुरक्षा समितीने रस्ते ...

अपघाताचे प्रमाण २७ टक्के तर मृत्यूचे ३२ टक्क्यांनी घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरातील रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड घसरले आहे. रस्ता सुरक्षा समितीने रस्ते अपघाताचा आढावा घेतला असता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघाताचे प्रमाण २७ टक्क्यांनी व रस्ता अपघातात मृत्युचे प्रमाणे ३२ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे.
रस्ता सुरक्षा समितीने घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट करण्यात आली. शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली. रस्ता सुरक्षा समितीचे उपाध्यक्ष खा. विकास महात्मे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख, विनोद जाधव, विदर्भ ऑटोचालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव, अशासकीय सदस्य चंद्रशेखर मोहिते, जनआक्रोश संस्थेचे सचिव रवि कासखेडीकर, अशोक करंदीकर आदी उपस्थित होते.
रस्ता अपघाताचे प्रमाण शहरात घटल्याचे दिसून येते तर ग्रामीण भागात अजूनही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बॉक्स
जिल्ह्यात ३२ ब्लॅक स्पॉट
नागपूर जिल्ह्यात सध्या ३२ ब्लॅक स्पॉट (अपघाताच्या दृष्टीने धोकादायक स्थळ) आहेत. या ठिकाणी संबंधित विभागांनी आवश्यक अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. तसेच याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान
केंद्र शासनामार्फत १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सांसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. समितीचे ब्रीद वाक्य सडक सुरक्षा जीवन रक्षा असे आहे. अभियानादरम्यान अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्ती व जखमी व्यक्तीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.