शौचालयातील भ्रूण मृत्यू प्रकरण एक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:25+5:302021-02-11T04:09:25+5:30

उमरेड : ग्रामीण रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मधील शौचालयात मृतावस्थेत आढळून आलेले भ्रूण नेमके कुणाचे या निष्कर्षापर्यंत उमरेड पोलीस ...

An accidental case of fetal death in the toilet | शौचालयातील भ्रूण मृत्यू प्रकरण एक अपघात

शौचालयातील भ्रूण मृत्यू प्रकरण एक अपघात

उमरेड : ग्रामीण रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १३ मधील शौचालयात मृतावस्थेत आढळून आलेले भ्रूण नेमके कुणाचे या निष्कर्षापर्यंत उमरेड पोलीस पोहोचले आहेत. शौचालयातील भ्रूण मृत्यू प्रकरण हा एक अपघात असून महिलेच्या अज्ञानाचा आणि लपवाछपवीच्या कारणामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढत गेल्याची बाब पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी व्यक्त केली.

एका खेडेगावातील ही २७ वर्षीय विवाहित महिला असून तिला एक चार वर्षांचा मुलगा तर ८ महिन्याची मुलगी आहे. अशातच ती चार महिन्याची गरोदर राहिली. याबाबत महिलेने कुटुंबीयांपासून ही माहिती दडवून ठेवली. शनिवारी (दि.६) रात्री १२ वाजताच्या सुमारास पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने ती अन्य महिलांसोबत आपल्या गावातून उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. या ठिकाणी तिने डॉ. अजितसिंग खंडाते यांच्याकडे ४ महिन्याची गरोदर असून मी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. मला पोटदुखीचा त्रास होत आहे, अशी कैफियत मांडली.

दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी काढूया असा विचार पुढे आल्यानंतर तिच्या पोटदुखीवर उपाययोजना म्हणून औषधोपचार केल्या गेले. सदर महिलेस वॉर्ड क्रमांक १३ मध्ये देखरेखीखाली ठेवल्या गेले. काही तासानंतर आणखी पोटदुखीचा त्रास झाल्याने सदर महिला शौचालयात गेल्यानंतर गर्भातील भ्रूण पडले. ती प्रचंड घाबरली. कुणालाही थांगपत्ता लागू न देता रात्री ३ वाजताच्या सुमारास परस्पर गावाकडे निघून आली. या संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा ग्रामीण रुग्णालयातील माहितीवरून आणि उमरेड पोलिसांच्या एकूणच तपासावरून स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांच्याशी चर्चा केली असता, या प्रकरणातील संपूर्ण माहिती पोलिसांना दिली असून हा एक अपघात असल्याचीही बाब त्यांनी स्पष्ट केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचेही त्या बोलल्या. सदर महिला अत्यंत गरीब असली तरी दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयाने सुरक्षाव्यवस्था आणि अन्य बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही लावताच कशाला

ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही आहेत. सीसीटीव्ही असले तरी रेकॉर्डिंगबाबतचा घोळ असल्याचीही बाब या गंभीर घटनेनंतर समोर आली आहे. सीसीटीव्ही लावूनही घटनाक्रम उजेडात येत नसेल तर मग सीसीटीव्ही लावताच कशाला, असा सवाल विचारला जात आहे.

Web Title: An accidental case of fetal death in the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.