मानकापूर उड्डाण पूल झाला ‘अॅक्सिडेंट स्पॉट’
By Admin | Updated: February 6, 2015 00:59 IST2015-02-06T00:59:37+5:302015-02-06T00:59:37+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने

मानकापूर उड्डाण पूल झाला ‘अॅक्सिडेंट स्पॉट’
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कोराडी रोडवर मानकापूर येथे उभारलेला उड्डाण पूल टाकळी फरस चौकात उतरतो व तेथूनच दुसरा रेल्वे उड्डाण पूल सुरू होता. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे टाकळी फरस चौकात उपघातांचे सत्र सुरू आहे. या चौकात सिग्नल लावून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, सिग्नल कुणी लावावा या विषयावर महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरणाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.
मानकापूर उड्डाण पूल दोन भागात बांधण्यात आला आहे. मानकापूर चौक झिंगाबाई टाकळी फरस चौकपर्यंत पहिला पूल व झिंगाबाई टाकळी ते कोराडी रोडवरील रेल्वे लाईन ओलांडणारा दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पुलावरून कोराडीकडून येणारी वाहने तसेच मानकापूरकडून कोराडीकडे जाणारी वाहने टाकळी फरस चौकात उतरतात. पुलावरून ही वाहने भरधाव येतात. विशेष म्हणजे या चौकातून एक रस्ता पश्चिमेकडे झिंगाबाई टाकळीकडे जातो तर दुसरा रस्ता पूर्वेकडील वस्त्यांमध्ये जातो.
टाकळीतून पुलावर चढणारी वाहने व पुलावरून दोन्ही बाजूंनी भरधाव वेगाने येणारी वाहने यात धडक होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असे अपघातही घडले आहेत. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी डिव्हायडर लावून पूर्व व पश्चिमेकडून पुलावर चढणारी वाहने बंद केली होती. त्यामुळे समोर पुलाखाली असलेल्या बोगद्यातून वाहने न्यावी लागत होती. यात लहान गाड्यांची अडचण नव्हती. पण स्टार बस, ट्रक ही वाहने बोगद्यातून नेण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी स्टार बस प्रशासनाने या मार्गावरील स्टार बस बंद केली होती. शेवटी नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत पोलिसांनी डिव्हायडर हटविले. वाहतूक सुरू झाली पण धोका मात्र कायम आहे.
या दोन्ही पुलाच्या मधील टाकळी फरस चौकात सिग्नल लावावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तत्कालीन प्रकल्प संचालक चंद्रशेखर यांची भेट घेत सिग्नल लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी चंद्रशेखर यांनी महापालिकेला पत्र देत सिग्नल लावण्याची सूचना केली. महापालिकेने या पत्रावर सिग्नल लावण्याची मंजुरी दिली.
प्रस्ताव तयार केला पण आपल्याकडे निधी नाही नसल्याचे सांगत महामार्ग प्राधिकरणाने यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. आजवर सिग्नल लावण्यासाठी निधी कोण देणार हे स्पष्ट झालेले नाही.
एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सुभाष मानमोडे यांच्या नेतृत्वात वसंतराव मोथे, डॉ. मधुसूदन मैंद, संजय मैंद, सुनील पाली, युवराज चौरसिया, प्रशांत चौधरी, अमर खोडे, उकुंडराव राऊत, अॅड. राजू ढोबळे, सुनील चौधरी, सुरेश मोथे आदींच्या शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मिश्रा यांची भेट घेऊन लिग्नल लावण्याचे निवेदन दिले.
आ. सुधाकर देशमुख यांचीही भेट घेतली. आमदार व प्रकल्प संचालक दोघांनीही प्रत्यक्ष मोक्कापाहणी करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्ती कधी होईल, सिग्नल कधी लागतील व धोका कधी टळेल याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. सिग्लचे काम त्वरित न झाल्यास रस्ता रोका करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)