‘गे आणि तृतीयपंथी’ अपत्याचा स्वीकार; मातृत्वाची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:19 IST2019-05-11T23:18:00+5:302019-05-11T23:19:53+5:30
आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं असावं, त्यात काहीतरी विशेष असावं, असं कोणत्याही आईला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र हे ‘वेगळेपण’ पुरुषी लैंगिकतेबाबत समाजात दृढ असलेल्या चौकटींहून भिन्न निघालं तर मग तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो. आपला मुलगा ‘गे’ किंवा ‘तृतीयपंथी’ आहे असे एखाद्या आईला जाणवते तेव्हा तिच्या भावविश्वाला हादरा बसतो. तो मुलगा परंपरागत चालत आलेल्या पायंड्यांना मोडून वेगळ्याच वाटा चोखाळणार असतो. अशा मुलाचा आई म्हणून स्वीकार करण्याच्या बिकट कसोटीला खऱ्या उतरलेल्या मातृशक्तींनी आज प्रथमच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. हे करताना त्यांनी, लोकमतमुळे मनात दडवून ठेवलेल्या भावभावना आपल्या मुलांनी जाणल्या, असा कृतज्ञभावही व्यक्त केला आहे.

‘गे आणि तृतीयपंथी’ अपत्याचा स्वीकार; मातृत्वाची कसोटी
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं असावं, त्यात काहीतरी विशेष असावं, असं कोणत्याही आईला वाटणं स्वाभाविक आहे. मात्र हे ‘वेगळेपण’ पुरुषी लैंगिकतेबाबत समाजात दृढ असलेल्या चौकटींहून भिन्न निघालं तर मग तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो. आपला मुलगा ‘गे’ किंवा ‘तृतीयपंथी’ आहे असे एखाद्या आईला जाणवते तेव्हा तिच्या भावविश्वाला हादरा बसतो. तो मुलगा परंपरागत चालत आलेल्या पायंड्यांना मोडून वेगळ्याच वाटा चोखाळणार असतो. अशा मुलाचा आई म्हणून स्वीकार करण्याच्या बिकट कसोटीला खऱ्या उतरलेल्या मातृशक्तींनी आज प्रथमच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. हे करताना त्यांनी, लोकमतमुळे मनात दडवून ठेवलेल्या भावभावना आपल्या मुलांनी जाणल्या, असा कृतज्ञभावही व्यक्त केला आहे.
तो ‘गे’ आहे, ‘क्रिमिनल’ नाही
समलैंगिक व्यक्ती हा शब्द आता समाजाला अनोखा नाही. अशा व्यक्ती असतात आणि त्या आपली ओळख न लपवता समोर येत आहेत, हेही समाज जाणतो. मात्र जेव्हा एखाद्या घरात असे वेगळे मूल जन्म घेते तेव्हा त्या कुटुंबासाठी ते कायमच एका आव्हानासारखे उभे असते. त्याचे लैंगिक प्राधान्यक्रम हे परंपरागत प्राधान्यक्रमापेक्षा भिन्न आहेत, याचा स्वीकार करणे सोपे नसते. बºयाच ठिकाणी अख्खे कुटुंब आणि सगळे नातेवाईक त्याला बदलविण्याचा प्रयत्न करीत असतात. या लढाईत तो एकटाच पडलेला असतो. एकीकडे कुटुंब, दुसरीकडे समाज आणि तिसरीकडे आपली वेगळी ओळख पटवून देण्याची धडपड सुरू असते. या द्वंद्वात या मुलाच्या स्वीकाराचे पहिले पाऊल टाकण्यासाठी पुढे येते ती त्याची आईच. ती त्याचा तो जसा आहे तसाच स्वीकार करते. त्याचे वेगळेपण कुठल्याही चष्म्याविना पाहते आणि समजून घेते. आईने आपल्याला स्वीकारलं आहे याची जाणीव त्या मुलासाठी फार मोठी गोष्ट असते. तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो. तो क्षण पेलणे हे त्याच्या आईसाठीही तितकेच अवघड असते. माझा मुलगा ‘गे’ आहे हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा, काही काळासाठी संभ्रम होता. पण जेव्हा त्याने त्याच्या भावविश्वाविषयी मला सविस्तर सांगितलं तेव्हा मला त्याच्या विचारात कुठे चूक दिसली नाही. त्याचं ‘गे’ असणं हा निसर्गाचा एक भिन्न आविष्कार आहे. त्यात त्याचा स्वत:चा काहीच दोष नाही. त्यामुळे मला माझा बच्चा इतर मुलांप्रमाणेच नॉर्मल वाटतो. मला कुणी काही बोलण्याआधी मी स्वत:च सांगते, तो ‘गे’ आहे, क्रिमिनल नाही, म्हणून. त्यालाही सर्व गोष्टी करण्याचा हक्क आहे. आज समाजही याबाबत बराच पुढारला आहे. ३७७ कलम रद्द झाल्यानंतर तर सर्वांनीच एलजीबीटी समुदायाविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी माझ्या मुलाला खूप खंबीर बनवलं आहे. कुठलीही समस्या समोर आली तरी तो मागे हटणार नाही, याची मला खात्री आहे. प्रत्येक आईप्रमाणेच मलाही वाटतं की, त्याला सुरक्षित जीवन मिळावं व त्याला योग्य जोडीदार मिळावा. माझ्या आयुष्याचा तोच आधार आहे. त्याने कधी आयुष्यापासून पळ काढला नाही किंवा आत्महत्येचा विचार केला नाही म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.
संगीता
तिनेच मला जन्म दिला
मी एका तृतीयपंथी मुलाला जन्म दिला आहे, हे स्वीकारणं आधी फार अवघड गेलं. त्याच्यातील बदल मी पाहत होते. तोही माझ्याशी बोलत होता. आमच्या घरातील सर्वच त्याच्या विरोधात होते. या विरोधामुळे त्याची होणारी तगमगही मला जाणवत होती. त्याला शिक्षणाची आवड होती. त्याची ती धडपड पाहून मला एका क्षणी जाणवलं की, त्याला माझी नितांत गरज आहे आणि मी त्याच्या पाठीशी उभे झाले. खरं तर मी त्याला जन्म दिला असला तरी, माझ्यातील मातृत्वाला तिनेच एक नवा जन्म दिला आहे.
मीनाक्षी
‘त्याचा’ बिनशर्त स्वीकार करा
माझा २० वर्षांचा इंजिनियर मुलगा गे असल्याचे कळल्यावर आमच्या घरात भूकंप आला होता. त्यावेळी मला गेविषयी फारशी माहिती नव्हती. काही काळ लोटल्यानंतर मी त्याला तो जसा आहे तसा स्वीकारले व त्याला तसे निर्धारपूर्वक सांगितलेही. कारण तो स्वत: डिप्रेशनमध्ये होता. त्याला माझी गरज होती. त्याच्या गे असण्याने आमच्या कुटुंबात बरीच वादावादी झाली आणि मी मुलाला सोबत घेऊन विभक्त राहू लागले. एक सिंगल पेरेंट या नात्यानेही माझ्यावर त्याची अधिक जबाबदारी होती. तो अभ्यासात हुशार होता. कुठलेही काम करायला सांगा, तो उत्कृष्ट करायचा. हळूहळू त्याच्यातील आत्मविश्वास परत आला. आज आम्ही दोघे अतिशय समाधानात जगत आहोत. मला वाटतं, आईनेच जर गे मुलाला स्वीकारलं नाही मग जग कसं स्वीकारेल? तो कसा जगेल एकटा? त्याचा गे असण्यात दोष काय आहे? म्हणून त्यांचा बिनशर्त स्वीकार करावा, एवढंच मला सर्वांना सांगावंसं वाटतं.
दिशा