समाधानकारक पावसामुळे पाण्याची मुबलकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:40+5:302021-04-30T04:11:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने यावर्षी रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात फारशी पाणीटंचाई निर्माण झाली ...

समाधानकारक पावसामुळे पाण्याची मुबलकता
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने यावर्षी रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात फारशी पाणीटंचाई निर्माण झाली नाही. असे असले तरी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला असून, प्रशासनाने त्याला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या कामाचे प्राकलन व सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
दरवर्षी जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने तीन टप्प्यात वेगवेगळ्या उपाययाेजना केल्या जातात. तालुक्यात १ ऑक्टाेबर ते ३१ डिसेंबर २०२० या पहिल्या टप्प्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवली नसल्याने काेणतीही कामे करण्यात आली नाहीत. मार्च ते एप्रिल हा काळ पाणीटंचाईचा दुसरा टप्पा मानला जाताे. याही काळात कुठेही पाणीसमस्या निर्माण झाली नाही. मे ते जून हा पाणीटंचाई निवारणाचा तिसरा टप्पा हाेय. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी खाेलवर जायला सुरुवात झाल्याने, या तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातील काही भागात पाणीटंचाई निर्माण हाेऊ शकते. ही समस्या साेडविण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून त्याला मंजुरी दिली आहे. शिवाय, पुढील मंजुरीसाठी हा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रामटेक तालुक्यात मागील वर्षी ११२२.४५० मिलि पावसाची नाेंद करण्यात आली. सर्वाधिक ४६८ मिलि पाऊस ऑगस्ट २०२० मध्ये काेसळला असून, जुलै २०२० मध्ये २५० मिलि तर सप्टेंबर २०२० मध्ये १०९ मिलि पाऊस काेसळल्याची नाेंद करण्यात आली. तालुक्यात साधारणत: ९८ दिवस चांगला पाऊस बरसला. त्यामुळे यावर्षी तालुक्यात फारशी पाणीटंचाई निर्माण झाली नाही. यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाल्यास अथवा सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसल्यास पुढील वर्षी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
....
१३१ कामे मंजूर
या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात नळ दुरुस्ती विशेष याेजनेची १७ कामे, नवीन विंधन विहिरींच्या ६८ पैकी आठ कामे व ९० विंधन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय, विंधन विहिरींच्या दुरुस्तीची २४ तर सार्वजनिक विहिरींच्या खाेलीकरणाची १७ कामे प्रस्तावित हाेती. यातील १५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. एका खासगी विहिरीच्या अधिग्रहण प्रस्तावासह एकूण १३१ विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
...
मागील वर्षीची कामे पूर्णत्वास
मागील वर्षी तालुक्यातील पाणीपुरवठ्याची काही कामे अपूर्ण राहिली हाेती. यातील बहुतांश कामे ही पाणीटंचाईच्या तिसऱ्या टप्प्यातील आहेत. पंचायत समितीला नुकताच निधी प्राप्त झाल्याने, प्रशासनाने या निधीतून मागील वर्षी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करायला सुरुवात केली. यात तालुक्यातील हॅण्डपंपच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून, मागील वर्षीची विहीर दुरुस्ती व विहीर अधिग्रहणाची कामे अजूनही अपूर्णच हाेती. ती कामे पूर्ण केली जात आहेत.
...
संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार केला असून, मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून मागील वर्षीची अपूर्ण कामे पूर्ण केली जात आहेत. नव्याने निधी प्राप्त हाेताच यावर्षीच्या कामांना सुरुवात केली जाईल. त्याअनुषंगाने नवीन कामांचे प्राकलन व सर्वेक्षण सुरू केले आहे.
- प्रदीप ब्रम्हनाेटे, खंडविकास अधिकारी,
पंचायत समिती, रामटेक.