घोषणांची भरमार; अंमलबजावणी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:49+5:302021-02-05T04:49:49+5:30

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहताना अनेक घोषणा केल्या; पण या घोषणांची पूर्तता ...

An abundance of announcements; Implementation is important | घोषणांची भरमार; अंमलबजावणी महत्त्वाची

घोषणांची भरमार; अंमलबजावणी महत्त्वाची

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहताना अनेक घोषणा केल्या; पण या घोषणांची पूर्तता आणि अंमलबजावणी योग्यरीत्या झाल्यास सक्षम भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अर्थसंकल्पात कोरोना महामारीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व क्षेत्रासाठी काही ना काही देऊन शाश्वत विकासाचा प्रयत्न अर्थसंकल्पाचा दिसून येत आहे. पुढे महागाई कमी होऊन सामान्यांचे जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न सरकारने करावा, अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अर्थसंकल्पावर ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रगतिशील अर्थसंकल्प ()

कोरोना महामारीच्या संकटात सादर केलेला अर्थसंकल्प प्रगतिशील आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक नवीन घोषणांचा समावेश आहे. किफायत घरांसाठी एटीआयचा कालावधी एका वर्षासाठी वाढविण्यात आला आहे. गृहकर्जावरील व्याजावर कर सवलत वाढविण्याचा निर्णय चांगला आहे.

महेश साधवानी, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.

बजेट उद्योग-व्यवसायासाठी उत्तम ()

यंदाचा बजेट उद्योग आणि व्यवसायासाठी सर्वोत्तम आहे. पायाभूत सुविधांसाठी जास्त फंड दिला आहे. सेबी कायदा, ठेवी कायदा, सिक्युरिटी कॉन्ट्रक्ट कायदा आदींना मिळून एक कायदा आणण्याचा निर्णय उत्तम आहे. लहान करदात्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी फेसलेस डिस्पूट रिझॅल्युशनचा प्रस्ताव, जुन्या केसेसवर कर निर्धारणाचा अवधी कमी करण्याचे निर्णय स्वागतार्ह आहे.

सीए कैलास जोगानी, माजी अध्यक्ष, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स.

लहान व्यापाऱ्यांसाठी सुविधाजनक ()

वन मॅन कंपनीच्या अटी हटविल्याचा फायदा लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना कंपनी बनवून व्यवसाय करण्यास सुविधा होणार आहे. भागीदारी फर्ममुळे भागीदाराला कॅपिटल कॉन्ट्रिब्युशनमुळे जास्त उत्पन्नावर आयकर भरावा लागेल. प्रवासी कर्मचाऱ्यांसाठी किफायत घराच्या भाड्यावर आयकरात सूट दिल्याचे स्वागत आहे. विकासकामांसाठीच्या तरतुदींचा नागरिकांना फायदा होईल.

संजय के. अग्रवाल, उपाध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

अर्थव्यवस्थापूरक बजेट ()

कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सर्व क्षेत्राच्या विकासाचा मजबूत पाया सरकारने ठेवला आहे. आरोग्यक्षेत्रासाठी जास्त निधी देऊन संपूर्ण भारताला निरोगी करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. बजेटच्या माध्यमातून किफायतशीर घरे देण्याचा संकल्प पूर्णत्वास जाणार आहे. बजेट सर्वोत्तम आहे.

दिलीप नरवडीया, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद.

स्क्रॅप पॉलिसी फायद्याची ()

अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार स्क्रॅप पॉलिसीने ऑटोमोबाइल क्षेत्राला फायदा होणार आहे. तसे पाहता सामान्यांसाठी हा निर्णय योग्य नाही. तंत्रज्ञान प्रगत आणि वाहनांच्या देखरेखसंदर्भात जागरूकता निर्माण होण्याने तसेच रस्ते चांगले झाल्याने वाहनांचे आयुष्य वाढले आहे. या हिशोबाने स्क्रॅप पॉलिसीत वाहनांचे आयुष्य किमान २५ वर्षांपर्यंत ठेवता येऊ शकते.

अशोक कुमार गांधी, ऑटोमोबाइल व्यावसायिक.

अर्थसंकल्पात सक्षम भारताचे स्वप्न ()

अर्थसंकल्पात सामान्य आणि महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य योजना आणि शुद्ध पाणीपुरवठ्यावर विशेष भर दिल्याने सक्षम भारताचे स्वप्न साकार होणार आहे. पायाभूत सुविधांवर विशेष भर दिल्याने रोजगाराच्या संधी वाढतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावरही भर दिला आहे. पण छोटे आणि मध्यम व्यापाऱ्यांना दूर लोटले आहे. आयकर स्लॅबमध्ये बदल न केल्याने सामान्य नाराज आहेत.

रामअवतार तोतला, सचिव, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

सकारात्मक अर्थसंकल्प ()

यंदा अर्थसंकल्प सकारात्मक असून, सर्वांना दिलासा देणारा आहे. आता ७५ वर्षांवरील वयस्कांना रिटर्न भरण्याची गरज नाही. शिवाय आयकराची प्रकरणे पुन्हा उघडण्याची अवधी कमी केल्याचे स्वागत आहे. आयकर अपीलेट टिब्युनल फेसलेस झाल्याने आयकरसंदर्भातील कार्यात पारदर्शकता येणार आहे. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्राला प्राधान्य देऊन विकासाचा सरकारचा संकल्प दिसून येत आहे.

सीए किरीट कल्याणी, अध्यक्ष, आयसीएआय, नागपूर शाखा.

सकारात्मक पुढाकाराने बजेट विकासात्मक ()

पायाभूत सुविधा, एमएसएमई, स्टार्टअपवर लक्ष केंद्रित केल्याने यंदाचा बजेट विकासात्मक असून, आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरणार आहे. तरलतेचा तणाव दूर करण्यासाठी एमएसएमई, ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना निरंतर कर्ज प्रदान करण्यात पीएसयू बँकांसाठी अतिरिक्त निधीची घोषणा योग्य पाऊल आहे. यामुळे एमएसएमई क्षेत्र आत्मनिर्भर होणार आहे. याशिवाय स्टार्टअप प्रोत्साहन देण्याच्या घोषणा उत्तम आहेत.

वरिष्ठ सीए जुल्फेश शाह.

रिअल इस्टेटला बूस्ट मिळणार ()

रिअल इस्टेट क्षेत्रासाठी केलेल्या घोषणांचे स्वागत असून, या क्षेत्राला बूस्ट मिळेल. यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला मागणी अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या तरतुदींव्यतिरिक्त बरेच काही दिले आहे. आयटी स्लॅबमध्ये कपात आणि कोरोना परिणामांमुळे खरेदीदारांसाठी गृहकर्जाचे व्याज कमी होण्याच्या अपेक्षांवर लक्ष दिलेले नाही. बजेटमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा नक्कीच विचार केला आहे.

अनिल नायर, माजी अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.

अर्थसंकल्प विकासात्मक ()

बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, विमा, शिक्षण व शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना उत्तम असल्याने यंदाचा अर्थसंकल्प विकासात्मक आहे. त्यामुळे देशाचा विकास व अर्थव्यवस्था सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. बॅड बँक स्थापनेच्या घोषणेने कर्जबुडव्यांवर अंकुश येईल. किफायत घरांसाठी केलेल्या घोषणांचे स्वागत आहे. बँक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थसंकल्पात दिसून येतो.

रवींद्र दुरुगकर, अध्यक्ष, गांधीबाग सहकारी बँक.

आत्मनिर्भर भारतावर लक्ष ()

पायाभूत सुविधांचा विकास आणि सर्वसामान्यांचे आरोग्य व कल्याणावर लक्ष केंद्रित करून अधिक सकारात्मक आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीकडे अर्थव्यवस्था जात असल्याचे दिसून येते. एमएसएमई, इन्फ्रा शहरी पाणी, वस्रोद्योग, वीज वितरण, कृषी व आरोग्य क्षेत्रावर लक्ष आणि त्यावरील खर्चात वाढ करून नवीन भारत उभारण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील तरतूद नागपूरसाठी स्वागतार्ह पाऊल आहे.

सीए साकेत बागडिया, उपाध्यक्ष, आयसीएआय, नागपूर शाखा.

कृषिक्षेत्राला प्राधान्य देणारा बजेट ()

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांचे स्वागत आहे. कृषिक्षेत्राला प्राधान्य देणारा बजेट आहे. ऑपरेशन ग्रीन स्कीमच्या घोषणेत अनेक पिकांचा समावेश केला आहे. मुख्य म्हणजे आधारभूत किंमत दुप्पट केली आहे. सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अतिरिक्त निधीची घोषणा स्वागतार्ह आहे. आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या घोषणांचे स्वागत आहे.

प्रताप मोटवानी, सचिव, होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असो.

Web Title: An abundance of announcements; Implementation is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.