परीक्षा दिल्यानंतरदेखील दाखविले अनुपस्थित; २२ विद्यार्थी अनुत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:13+5:302021-08-21T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे एलएलएमच्या चौथ्या सत्रातील २२ विद्यार्थी प्रचंड तणावात आले ...

परीक्षा दिल्यानंतरदेखील दाखविले अनुपस्थित; २२ विद्यार्थी अनुत्तीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे एलएलएमच्या चौथ्या सत्रातील २२ विद्यार्थी प्रचंड तणावात आले आहेत. परीक्षा दिल्यावरदेखील त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले व अनुत्तीर्ण म्हणून त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. सुधारित निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांची पीएच.डी. नोंदणीसाठी आवश्यक असलेली पेट देण्याची संधी गेली आहे.
एलएलएमच्या चौथ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये झाली व ९ जुलै रोजी निकाल घोषित झाला. २२ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. विद्यापीठाला तक्रार करण्यात आली व त्यांचा दावा योग्य असल्याचे सिद्धदेखील झाले. जुनी गुणपत्रिका देऊन आठवडाभरात नवीन गुणपत्रिका घेऊन जाण्याबाबत परीक्षा विभागातून सांगण्यात आले. आतापर्यंत विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका मिळालेली नाही. परीक्षा विभागात त्यांना काही ना काही कारणे सांगून परत पाठविले जात आहे.
मागील एका महिन्यापासून हे विद्यार्थी लवकर निकाल लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना गंभीरतेने घेतलेलेच नाही. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनादेखील विद्यार्थ्यांनी संपर्क केला. मात्र साबळे विद्यार्थ्यांना भेटलेही नाही व त्यांचे फोनदेखील उचलले नाही. एसएमएसचे उत्तर देण्याची तसदीदेखील साबळे यांनी घेतली नाही. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.