नियोजन नसल्याने अभय योजना अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST2021-01-08T04:19:00+5:302021-01-08T04:19:00+5:30
- वसुलीला अपेक्षित प्रतिसाद नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड विचारात घेता मनपा प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीकरावर ...

नियोजन नसल्याने अभय योजना अडकली
- वसुलीला अपेक्षित प्रतिसाद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड विचारात घेता मनपा प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीकरावर अभय योजना आणली. यात थकबाकीदारांचा दंड माफ करण्याची तरतूद आहे. तर मूळ रक्कम भरणे आवश्यक आहे. असे असूनही हे मालमत्ताधारक थकबाकी भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
मालमत्ता कराच्या अभय योजनेत आतापर्यत ९,८४९ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला. थकबाकीदारांनी १०.७८ कोटी जमा केले. यात त्यांना ३.१३ कोटी माफ झाले. पाणीकराच्या अभय योजनेत १०,४४८ ग्राहकांनी लाभ घेतला. त्यांनी ३.२६ कोटी जमा केले. मालमत्ता कराची थकबाकी ५५० कोटी तर पाणीपट्टीचे २०० कोटीहून अधिक थकीत आहे. परंतु वसुली बघता या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी अभय योजनेचा आढावा घेतला. वसुलीसाठी व्यापक स्वरूपात जनजागृती होत नसल्यावर नाराजी व्यक्त केली.
नगरसेवक आपल्यास्तरावर प्रभागात योजनेसंदर्भात जनजागृती करीत आहेत. परंतु प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकबाकीदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी झोनच्या अधिकाऱ्यांवर निर्भर आहेत.
......
नागरिकांनी टँक्स का भरावा?
प्रभागातील विकास कामे व्हावीत, यासाठी नागरिक कर भरतात. विकास कामे होत नसतील तर नागरिकांनी कर का भरावा, असा सवाल एका नगरसेवकांनी केला. अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी नागरिक कर भरत नसल्याचे त्यांनी सांगितले.
...
उद्दिष्टाच्या खूप मागे
मनपा प्रशासनने मालमत्ता करातून ३०० कोटी तर पाणीकरातून १७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. परंतु १ जोनवारीपर्यंत मालमत्ता करातून १५७.५५ कोटी तर पाणीकरातून १०२ कोटी वसूल झाले.