घरासमोरून चिमुकल्याचे अपहरण

By Admin | Updated: February 11, 2016 03:18 IST2016-02-11T03:18:57+5:302016-02-11T03:18:57+5:30

अजनी येथील विश्वकर्मानगरात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचे त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले.

Abduction of a sperm from the front of the house | घरासमोरून चिमुकल्याचे अपहरण

घरासमोरून चिमुकल्याचे अपहरण

विश्वकर्मानगर येथील घटना : ३६ तास उलटूनही ‘राज’चा पत्ता नाही
नागपूर :अजनी येथील विश्वकर्मानगरात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचे त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले. घटनेला ३६ तास उलटूनही मुलाचा कुठलाही पत्ता लागला नसल्याने पोलीसही हादरले आहेत.

शेबू ऊर्फ राज अजय पांडे असे अपहृत चिमुकल्याचे नाव आहे. अजय पांडे हे फर्निचर पॉलिशचे काम करतात. त्यांच्या परिवारात पत्नी खुशी, मुलगा शेबू ऊर्फ राज, तीन वर्षाचा दुसरा मुलगा सुलतान आणि सर्वात मोठी आठ वर्षाची मुलगी रुबी आहे. अजय मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी आहेत. ते गेल्या दीड वर्षांपासून नागपुरात राहत आहे. अगोदर आपल्या साथीदारांसोबत ते राहत होते.
दीड महिन्यांपूर्वीच त्यांनी पत्नी आणि मुलांना नागपुरात आणले. त्यानंतर विश्वकर्मानगर येथील गल्ली नंबर ७ मध्ये जीतू सारवे यांच्या घरी ते भाड्याने राहू लागले. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर संपल्याने ते आणण्यासाठी अजय घराबाहेर पडले. त्याच्या मागेमागेच शेबूसुद्धा बाहेर निघाला. मुलगा परतल्याचे समजून अजय यांनी आपली गाडी काढली आणि ते निघून गेले. त्यावेळी पत्नी खुशी घरचे काम करीत होती. मुलगा वडिलांसोबत गेल्याचे समजून तिनेही काही लक्ष दिले नाही. काही वेळानंतर अजय घरी परत आले. त्यांनी पत्नीला मुलाबाबत विचारले.
तेव्हा मुलगा कुठे दिसून येत नसल्याचे लक्षात आले. दोघेही वस्तीत मुलाल शोधू लागले. तेव्हापर्यंत वस्तीतील लोकांनाही शेबू हरवल्याचे समजले. ते सुद्धा त्याचा शोध घेऊ लागले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मुलाचा शोध घेतल्यावर मुलगा कुठेच दिसून येत नसल्याने ते अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले.

बाहेरील व्यक्तीवर संशय
नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना १२ तासापर्यंत तक्रार दाखल करता येत नसल्याचा हवाला देत आणखी शोधण्यास सांगितले. तसेच आम्हीसुद्धा त्याचा शोध घेतो, असे आश्नासन दिले. त्यानंतर आईवडील व वस्तीतील लोक पुन्हा त्याचा शोध घेऊ लागले. रात्री १२ वाजेपर्यंत शेबू न सापडल्याने वस्तीतील नागरिकांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. तेव्हा कुठे अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तसेच सर्व पोलीस ठाण्यांनासुद्धा कळविण्यात आले.
प्राथमिक स्तरावर शेबूचे अपहरण झाल्याचे दिसून येते. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याची शक्यता आहे. विश्वकर्मानगर हा दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. वस्तीमध्ये नेहमीच वर्दळ असते. दोन वर्षाचा मुलगा फार दूरपर्यंत जाऊ शकत नाही. गेलाच असता तर तो भटकताना कुणाला तरी दिसून आला असता. अशा परिस्थितीत कुणीही त्याला त्याच्या आईवडिलांकडे किंवा पोलिसांकडे आणून दिले असते. अजयने सांगितल्यानुसार त्याचे कुणाशीही भांडण नाही. सकाळी कामावर निघून गेल्यावर तो केवळ जेवण करायलाच घरी येत असे. घरचा गरीब असल्याने खंडणीसाठी अपहरण होण्याती शक्यतासुद्धा कमीच आहे. अशा परिस्थितीत पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Abduction of a sperm from the front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.