अबब! अडीच वर्षांत नागपूरकरांच्या ४८७ मोबाइलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST2021-08-17T04:12:24+5:302021-08-17T04:12:24+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : आधुनिक काळात मोठ्या आकाराचे आणि महागडे मोबाइल वापरण्याची फॅशन वाढत आहे. हे मोठ्या आकाराचे मोबाइल ...

अबब! अडीच वर्षांत नागपूरकरांच्या ४८७ मोबाइलची चोरी
दयानंद पाईकराव
नागपूर : आधुनिक काळात मोठ्या आकाराचे आणि महागडे मोबाइल वापरण्याची फॅशन वाढत आहे. हे मोठ्या आकाराचे मोबाइल ना हातात बसतात, ना खिशात मावतात. त्यामुळे नागरिक मोबाइलचे काम झाले की तो बाजूला ठेवून देतात. याचाच फायदा घेऊन चोरटे मोबाइल पळवितात. गेल्या अडीच वर्षांत तब्बल ४८७ मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद नागपूर शहर पोलिसांनी केल्याची धक्कादायक माहिती आहे.
शहरातील मोबाइल चोरीच्या घटना
-२०१९ : १८८
-२०२० : १७०
-२०२१ : १२९ (जुलै महिन्यापर्यंत)
चोरी नव्हे गहाळ म्हणा
-अनेकदा मोबाइल चोरीला गेल्यानंतर संबंधित नागरिक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातो; परंतु अशा वेळी पोलीस चोरीची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी गहाळ झाल्याची म्हणजे मिसिंगची तक्रार नोंदवून घेतात. त्यामुळे मोबाइल चोरीचे गुन्हे कमी दाखल होतात आणि मिसिंगच्या घटना अधिक दाखल करून घेण्यात येत असल्याची माहिती आहे.
या भागात मोबाइल सांभाळा
-शहरातील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाइल चोरीच्या घटना घडतात, तसेच जरीपटका परिसर, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चितारओळ भागात गणेशमूर्ती विकण्याच्या काळात आणि सक्करदरा, तसेच गिट्टीखदान परिसरात मोबाइल चोरीच्या अधिक घटना होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
.................