‘आप’ने सुरू केली भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन
By Admin | Updated: July 23, 2015 03:07 IST2015-07-23T03:07:10+5:302015-07-23T03:07:10+5:30
सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो.

‘आप’ने सुरू केली भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन
पंकज गुप्ता यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांच्या तक्रारी सोडविणार
नागपूर : सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो. यापुढे सरकारी कार्यालयातून नागरिकांची कामे वेळेत होत नसतील तर थेट आम आदमी पार्टी नागपूर शहरतर्फे सुरू करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी नागरिकांना केले.
आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनचा शुभारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते झाला. या हेल्पलाईनचा क्रमांक ९४४५०७७२२२ हा आहे. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पंकज गुप्ता म्हणाले की, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती जनतेचे काम करण्यासाठी झाली आहे. मात्र हे कर्मचारी पैशाशिवाय जनतेचे कुठलेही काम करीत नाही. सरकारी कार्यालयात जनतेचे कुठलीही कामे वेळेत करून मिळत नाही. कार्यालयातील कर्मचारी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देतात. छोट्या छोट्या कामासाठी उद्या या, नंतर या असे सांगून त्रास देतात. त्यामुळे त्रस्त होऊन नागरिक दलालांकडे जातो. दलाल नागरिकांकडून पैसे घेऊन तत्काळ काम करवून देतात. हा प्रकार प्रत्येक सरकारी कार्यालयात सर्रास होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार केल्यास आपचे कार्यकर्ता थेट सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार आहे. यासाठी नागरिकांचा सहयोग अपेक्षित आहे.
या प्रकारामुळे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुश राहणार आहे. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखेडे, सचिव जगजितसिंग, नागपूर समन्वयक अशोक मिश्रा, सचिव कविता सिंगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकरी विकासासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा
आम आदमी पार्टीच्यावतीने विदर्भात शेतकरी-शेतमजूर संवाद यात्रा काढून, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला लागत मूल्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने, महत्त्वाचे कारण पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आप आर्थिक मदत करणार आहे.
मनपा निवडणूक लढण्याचा अद्यापही विचार नाही
आम आदमी पार्टी संघटना मजबूत करण्यासाठी बूथ लेव्हलवर क्रियाशील आहे. शहरात कार्यकर्ता जोडण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १८१० बूथपैकी आपचे १००० बूथ झाले आहेत. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची आहे. जनता जोपर्यंत आमच्यासोबत येणार नाही तोपर्यंत निवडणूक लढविण्याचा आपचा विचार नसल्याचे पंकज गुप्ता म्हणाले.