जिल्हा सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:46+5:302020-12-02T04:09:46+5:30

सावनेर/भिवापूर : दिवाळीनंतर दिल्लीसह राजस्थान, गुजरात राज्यात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर बाहेर राज्यातून ...

'Aao Jao Ghar Tumhara' | जिल्हा सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

जिल्हा सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

सावनेर/भिवापूर : दिवाळीनंतर दिल्लीसह राजस्थान, गुजरात राज्यात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर बाहेर राज्यातून येणाऱ्या प्र‌वाशांची व वाहणांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत मध्यप्रदेशच्या चेकपोस्टवर तपासणी पथकाची नियुक्ती केली गेली. मात्र वास्तविक चेकपोस्टवर कोणत्याच प्रकारची तपासणी केली जात नाही. त्यामु‌ळे नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. सावनेर तालुक्यातील केळवदजवळील आरटीओ नाका आणि परिसरात प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता येथे कोणत्याही वाहन चालकाची तपासणी होत नसल्याचे दिसून आले. याबाबत केळवद आरटीओ चेकपोस्टचे अधिकारी सदाशिव वाघ आणि सचिन फरताळे यांना विचारणा केली असता या नाका परिसरात कोरोना तपासणी पथक नाही. यामुळे तपासणीचा प्रश्नच उदभवत नाही असे त्यांनी सांगितले. इकडे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भिवापूर तालुका हा भंडारा, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यांना लागून आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांसह गोंदिया, गडचिरोली व तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशी आंतरराज्यीय प्रवासी वाहतूक या राष्ट्रीय मार्गाने होते. येथे नाके हटविण्यात आले असून कोणत्याही प्रकारची तपासणी होताना दिसत नाही. रामटेक तालुक्यात मानेगावटेक नाक्यावर तपासणी केली जात आहे. येथे कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर चन्ने यांच्या नेतृत्वात चमू सज्ज दिसून आली. या नाक्यार दिल्ली व राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी केली जात आहे.

---

बाहेर राज्यातून येणाऱ्या प्र‌वाशांची नाक्यावर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जर तपासणी होत नसल्याचे आढळून आले असेल तर पर्यवेक्षकांना सांगून संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील.

- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

-----

भिवापूर व सालेभट्टी (चोर) फाटा सर्वांसाठी खुला

लॉकडाऊनच्या काळात भिवापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर व सालेभट्टी (चोर) फाट्यावर जिल्हा सीमाबंदी नाके उभारून प्रवाशांची तपासणी केल्या गेली. आता मात्र या दोन्ही ठिकाणी कुठल्याही पध्दतीचे नाके अथवा तपासणी सुरू नाही. दोन्ही मार्गावरून बिनधास्त वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या तालुक्यात संक्रमणाचा धोका वाढला आहे.

----

केळवद नाक्यावर मास्क तपासणीकडे दुर्लक्ष

सावनेर तालुक्यातील केळवद जवळील आरटीओ नाका आणि परिसरात कुठेच पथकाद्वारे शासनाच्या निर्देशानुसार तपासणी केली जात नाही. याबात वाहनचालकांना विचारणा केली असता कुठेच तपासणी झाली नसल्याचे सांगितले. येथे कुणीही मास्क वापरले नव्हते कुणाचीही थर्मल टेस्ट केली जात नाही. त्यामुळे या नाक्यावरून संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे.

Web Title: 'Aao Jao Ghar Tumhara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.