ऑनलाइन ‘गेम’च्या नादात बंटी-बबलीच्या जाळ्यात अडकली महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 21:59 IST2022-10-11T21:57:57+5:302022-10-11T21:59:11+5:30
Nagpur News ‘ऑनलाइन गेम’च्या नादात कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी नातेवाईक दाम्पत्याची मदत घेणे एका महिलेला खूप महागात पडले.

ऑनलाइन ‘गेम’च्या नादात बंटी-बबलीच्या जाळ्यात अडकली महिला
नागपूर : ‘ऑनलाइन गेम’च्या नादात कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी नातेवाईक दाम्पत्याची मदत घेणे एका महिलेला खूप महागात पडले. संबंधित दाम्पत्याने महिलेला ब्लॅकमेल करत तब्बल १५ लाख रुपये उकळले. अमित तिवारी (३५) व रेणुका तिवारी (३०) असे दाम्पत्याचे नाव असून, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अमित सीताबर्डीच्या फुटपाथवर कपडे विकतो. त्याच्यावर खून व इतर गुन्हे दाखल आहेत. जरीपटका येथील ३५ वर्षीय महिलेचा तो नातेवाईक आहे. महिला ऑनलाइन गेमच्या नादाला लागली व तिने एका भावाकडून एक लाख उधार घेतले. ते पैसे फेडण्यासाठी तिने रेणुकाशी संपर्क साधला. रेणुकाने तिला अगोदर भिशीचे पैसे मिळतील त्यासाठी एक हप्ता द्यायचा आहे असे आमिष दाखविले. त्यानंतर विविध कारणे देत तिने महिलेकडून बरेच पैसे उकळले. सासऱ्यांचे इन्शुरन्सचे पैसे मिळणार असल्याचा नावाखाली दाम्पत्याने तिची एका स्टॅम्प पेपरवर सही घेतली. त्यात रेणुकाच्या चुलत सासऱ्यांना मी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे लिहिले होते व त्याखाली महिलेची धोक्याने स्वाक्षरी घेण्यात आली होती. त्यानंतर दोघांकडून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली. त्यांनी वर्षभरात तिच्याकडून १५ लाख रुपये उकळले. अखेर महिलेने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. खंडणीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बंटी-बबलीला अटक केली. महिलेने पतीच्या जॉइंट अकाउंटमधून संबंधित रक्कम काढली होती, अशी माहिती समोर आली आहे.