सलग १८ तास अभ्यास करून महामानवाला विद्यार्थ्याचे अनोखे अभिवादन
By आनंद डेकाटे | Updated: April 13, 2025 18:20 IST2025-04-13T18:20:03+5:302025-04-13T18:20:23+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर व विचारधारा विभागाचा उपक्रम : ७२ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

सलग १८ तास अभ्यास करून महामानवाला विद्यार्थ्याचे अनोखे अभिवादन
नागपूर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी केली जाते. नवीन पिढी काहीना काही नवीन अभियान हाती घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असते, असाच एक उपक्रम नागपुरात पार पडला. तो म्हणजे तब्बल १८ तास अभ्यास. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. या उपक्रमात ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात आयोजित या उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे १८ तास अभ्यास करायचे याची अनुभूती यावी व या १८ तासांत आपण नेमकं किती वाचन करू शकतो. आपली वाचन क्षमता किती? हे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात यावं, त्यांना कळावं या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवित आहे. त्याचा भाग म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर चेअर व विचारधारा विभागाने हा उपक्रम हाती घेतला. शनिवारी दुपारी १२ वाजता या अभियानाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस व रात्र पुस्तक वाचत काढली. आज रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी वाचत होते. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी जेवण, चहा, पाणी अशी सर्व व्यवस्था विभागातर्फे करण्यात आली होती.
- अशी होती व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या खालच्या मजल्यातील सभागृहात विद्यार्थ्यांना अभ्यासाची व्यवस्था करून देण्यात आली होती. अतिशय शांत वातावरणात विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास केला. विद्यार्थी आपापली डॉ आंबेडकर यांची पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसली होती.
- साठी पार केलेले विद्यार्थिही सहभागी
सलग १८ तास अभ्यास अभियानात ६० वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी सुद्धा उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. अल्का जारोंडे, मोरेश्वर मंडपे, भीमराव फुसे, हिरा सोनारे, निरंजन पाटील, उत्तम शेवडे, सिद्धार्थ पोफरे, सीमा मोहोड , स्मिता शेंडे, डॉ. सरोज डांगे, प्रीती वानखेडे, यांनी १८ तास अभ्यास अभियानाचा संकल्प पूर्ण केला. त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. डॉ रमेश शंभरकर यांनी आभार मानले.