लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन भोंदूबाबांनी वृद्ध दाम्पत्याच्या भावनिक अडचणींचा गैरफायदा घेतला व वाईट स्वप्न दूर करण्याच्या नावाखाली तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. आरोपींनी दाम्पत्याच्या मृत मुलाचा संदर्भ देत संपर्क केला. त्यानंतर त्यांनी फसवणुकीचे जाळे विणले. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
जगदीश परसराम जामगडे (६०, बिडगाव) हे शेतकरी आहेत. त्यांच्या एका मुलाचे निधन झाले आहे. १८ जुलै रोजी तथाकथित इंद्रपाल भोयर (पारशिवनी) नावाचा व्यक्ती ते घराबाहेर उभे असताना पोहोचला. त्याने तो भविष्य सांगतो अशी बतावणी केली व त्याने जामगडे यांना त्यांच्या मृत मुलाबाबत काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्याने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या व्यसनाबाबतदेखील काही बाबी सांगितल्या.
त्यामुळे जामगडे यांचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यांनी त्याला घरात बोलावले. जामगडे यांनी त्यांच्या पत्नीला वाईट स्वप्न येत असून त्यामुळे झोप येत नाही असे सांगितले. यावर आरोपीने उपाय करून दोष दूर करू असे सांगितले व मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर तो त्यांच्या संपर्कात होता. २० जुलै रोजी तो रात्री १२ वाजता विलास भोयर ऊर्फ उज्जैनचे महाराज याच्यासोबत पोहोचला. दोन्ही आरोपींनी जामगडे यांच्या पत्नीला घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांमुळे खराब स्वप्ने येत असल्याचे सांगितले. त्यावर उपाय करण्यासाठी सर्व दागिने आणायला सांगितले.
जामगडे दाम्पत्याने सर्व दागिने आणून त्यांच्यासमोर ठेवले. आरोपींनी ते दागिने देवासमोर ठेवून अगरबत्ती लावून प्रार्थना करायला सांगितले. जामगडे दाम्पत्य प्रार्थना करत असताना रात्री दोन वाजता आरोपींनी १७ तोळे सोन्याचे दागिने तसेच ५० ग्रॅम चांदीचे दागिने हाती घेतले. जामगडे दाम्पत्याला भुरळ पाडून आरोपी ते दागिने लगेच बाहेर जाऊन घरात आणून ठेवतो असे सांगून निघून गेले. मात्र, ते परतलेच नाही. जामगडे यांनी त्यांना फोन करून दागिने परत करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी टाळाटाळ केली व त्यानंतर फोनच स्वीच ऑफ केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जामगडे यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.