लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी (दि . ३१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास एक मनोरुग्ण शिरल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान सीताबर्डी पोलिसांनी या मनोरुग्णाला पिंजऱ्याच्या बाहेर काढून ताब्यात घेतले आहे.
करन सोमकूवर (२६, रा. प्रजापती नगर गड्डीगोदाम) असे वाघाच्या पिंजऱ्यात शिरलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. महाराज बाग प्राणी संग्रहालयाचे प्राणीपाल हरिभाऊ तिरमले गुरुवारी सकाळी प्राणी संग्रहालयात फिरत असताना त्यांना एक व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्यात शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या सह कर्मचाऱ्यांना बोलावून या घटनेची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांना दिली. त्यानंतर लगेच घटनेची माहिती सीताबर्डी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस तातडीने महाराजबाग प्राणी संग्रहालयात दाखल झाले. पोलिसांनी पिंजऱ्यात असलेल्या मनोरुग्णाला बाहेर काढून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याची बाब पोलिसांना कळली. याबाबत संबंधित मनोरुग्णाचा अनु रुग्णाच्या भावाला संपर्क साधण्यात आला आहे. त्याचा भाऊ आल्यानंतर या मनोरुग्णाला भावाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सांगितले.