अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मजुराला २० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 19:38 IST2022-04-01T19:37:40+5:302022-04-01T19:38:12+5:30
Nagpur News विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी मजुराला २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मजुराला २० वर्षे सश्रम कारावास
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी मजुराला २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्या. आर. पी. पांडे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना इंदिरानगर, जाटतरोडी येथील आहे.
रामाधर पवनू शेंदूर (५५) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २३ ऑक्टोबर २०१९ रोजी घडली. त्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व ते कुकृत्य लपवून ठेवण्यासाठी मुलीला पाच रुपये दिले. त्यावेळी मुलगी सात वर्षे वयाची होती. तिच्याजवळ पाच रुपये पाहून आईने सखोल विचारपूस केल्यानंतर आरोपीच्या गुन्ह्याचा भंडाफोड झाला. आईने लगेच इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पी. यू. भोयर यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दंडाची रक्कम पीडित मुलीला
आरोपीने दंड जमा केल्यास ती रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून अदा करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी पळसोदकर व ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.