भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 01:53 PM2022-01-21T13:53:45+5:302022-01-21T14:02:07+5:30

बुटीबोरी जवळील किरमिटी (भारकस) येथे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

a four year old girl killed in stray dogs attack | भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना

भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना

Next
ठळक मुद्देतीन कुत्र्यांनी एकाचवेळी घेतला चावा

नागपूर : खेळताना ठेच लागून खाली पडलेल्या चारवर्षीय चिमुकलीला तीन भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. पुढे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) नजीकच्या किरमिटी (भारकस) येथे नुकतीच घडली.

अंजली रामसोदर रावत (४, रा. किरमिटी भारकस) असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. ती गुरुवारी (दि. १३) घरासमोर खेळत असताना दगडाची ठेच लागल्याने खाली पडली. त्याचवेळी एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढवित चावा घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत चावा घ्यायला सुरुवात केली.

तिच्या रडण्याच्या आवाजामुळे नागरिकांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून अंजलीची सुटका केली. यात अंजली गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर लगेच टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला सुटी देण्यात आली. घरी आल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान तिने सोमवारी (दि. १७) शेवटचा श्वास घेतला.

कुत्र्यांचा बंदोबस्त करणार कोण?

गावात फिरणारी ही मोकाट कुत्री आता छोट्या मुलांच्या जिवावर उठली आहेत. त्या कुत्र्यांना जिवानिशी मारले तर काही मंडळी गांभीर्याने दखल घेत पोलिसात जातात. त्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल होण्याची भीती असल्याने कुणीही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची हिंमत करीत नाही. या कुत्र्यांना रेबिज किंवा अन्य आजार आहे की नाही, याची कुणालाही माहिती नाही. ही कुत्री भविष्यात अन्य छोट्या मुलांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

Web Title: a four year old girl killed in stray dogs attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.