योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जुलै महिन्यात एका इमारतीत काम करत असलेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणात हुडकेश्वर पोलीस ठाण्यात इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० जुलै रोजी सकाळी ११ वाजता अथर्व नगरी ०६ येथील निर्माणाधीन इमारतीच्या आठव्या मजल्यावरून वेस्ट मटेरिअल फेकण्याचे काम सुरू होते. दिनेश माणिक गायकवाड (४२, अभय नगर) हे घमेले भरून साहित्य खाली फेकत होते. अचानक त्यांचा तोल गेला व ते डोक्याच्या भारावर खाली पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. चौकशीदरम्यान इमारतीत बिल्डर किंवा बांधकाम ठेकेरादाने सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यांच्या निष्काळजीपणामुळे गायकवाड यांचा जीव गेल्याची बाब समोर आली.
पोलिसांनी अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक मनोज सुरमवार, चंद्रकांत सुरमवार, नरेंद्र मल्लेवार, राहुल मल्लेवार, राजू छानवार, राजू वाघमारे व बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.