- योगेश पांडे नागपूर - इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे प्रशांत कोरटकरला महागात पडले आहे. कोल्हापूरनंतर आता त्याच्याविरोधात नागपुरातदेखील गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कोरटकर अद्यापही फरारच असून त्याच्या शोधासाठी बेलतरोडी पोलीस ठाण्याची तीन पथके विविध दिशांना रवाना झाली आहेत.
कोरटकरने केवळ सावंत यांना धमकीच दिली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले. कोल्हापूरमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला व तेथील पथक गुरुवारी नागपुरात पोहोचले. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला, मात्र तेथे कुलूप होते. त्यानंतर दोन पथके मध्यप्रदेशात रवाना करण्यात आली. दुसरीकडे बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पथकेदेखील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात सकल मराठा समाज तसेच मुधोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात नागरिक कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही संघटनांनी कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी या माहितीला दुजोरा दिला. नागपूर सायबर पोलिसांकडून कोरटकरचा सीडीआर आणि लोकेशनच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे.
जर आवाज मॉर्फ आहे, तर कोरटकर फरार का?कोरटकरने कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला त्या दिवशी माझा आवाज मॉर्फ करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र त्याच दिवशी तो फरार झाला. जर आवाज मॉर्फ झाला आहे तर मग कोरटकर फरार का झाला व समोर येऊन चौकशीला सहकार्य का करत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.