नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ उपाययोजना केली नसती तर आज रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर दिल्लीपेक्षाही भयंकर दुर्घटना घडली असती असा सूर प्रवाशांमध्ये दिसत आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक बळी गेले. या दुर्घटनेपासून धडा घेत प्रभावी उपाययोजना करण्याचा अलर्ट सर्वच रेल्वे पोलिस आणि आरपीएफला देण्यात आला होता. त्याची तत्काळ दखल घेत नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे वॅगनमधून आगीचा भडका उडताच आणि आगीने शेडलाही कवेत घेतल्याचे लक्षात येताच रेल्वेस्थानकावर बंदोबस्तावर असलेले कर्मचारी तत्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी एकीकडे आग विझविणे सुरू केले. दुसरीकडे प्रवाशांचीही खबरदारी घेतली.
रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, परिचालन व्यवस्थापक कृष्णात पाटील, आरपीएफ कमांडंट मनोज कुमार आदींनी घटनास्थळ गाठले.
जीआरपीचे निरीक्षक गौरव गावंडे आणि आरपीएफचे निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या नेतृत्वात हवालदार चंद्रकांत भोयर, अमित त्रिवेदी मिश्रा, भूपेश धोंगडी, बी. आर. ठाकूर, ऋषिकांत राखुंडे, अनिल त्रिवेदी आदींनी फलाट तसेच बाजूला उभे असलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या कोचमधून अग्निशमन उपकरणे काढून तातडीने आग विझविणे सुरू केले. त्यामुळेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
तर झाली असती चेंगराचेंगरी
आगीचे लोळ पाहून फलाट तसेच तेलंगणा एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी दोन्ही बाजूने उड्या घेण्याचा पवित्रा घेतला. गाडीबाहेर पडण्यासाठी सर्वच जण एकाच वेळी धावपळ करीत असल्याचे पाहून जीआरपी आणि आरपीएफ तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून अटकाव केला. घाबरू नका, उड्या घेऊ नका, पळू नका, आम्ही येथेच आहोत, फलाटावर सुरक्षित ठिकाणी झोपून जा, असे पीए सिस्टममधून वारंवार सांगितले गेले. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षेची खात्री पटली. परिणामी, फलाटावर संभाव्य चेंगराचेंगरीची घटना टळली.
ती महिला बचावली
शेडला लागलेल्या आगीचा लोळ खाली पडताना एका महिलेच्या पाठीला भाजले. ती दिल्लीला जात होती. जीआरपी जवानांनी लगेच प्रथमोपचार केले. जास्त दुखापत नसल्याने ती महिला बचावली अन् दिल्लीकडे रवाना झाली.
ट्रेनच्या 'चिंगारी'ने केला घात
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आगीचे कारण पुढे आले. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली. त्याच गाडीच्या चाकाच्या घर्षणातून चिंगारी (ठिणग्या) उडाल्याने अतिज्वलनशील पेट्रोल-डिझेलच्या वॅगनने पेट घेतला आणि भडका उडाला. सीसीटीव्हीत हे सर्व दिसत असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने 'लोकमत'ला सांगितले.