१२ महिन्यात ९५ बाळं दुधाला मुकली

By Admin | Updated: May 18, 2016 03:05 IST2016-05-18T03:05:41+5:302016-05-18T03:05:41+5:30

आई असतानाही गेल्या १२ महिन्यात शून्य ते सहा वर्षांची ९५ निष्पाप बालके दुधाला मुकली.

95 babies of milk were sold in 12 months | १२ महिन्यात ९५ बाळं दुधाला मुकली

१२ महिन्यात ९५ बाळं दुधाला मुकली

जन्मदाते हयात, ५५६ बालके अनाथ : मुलींची संख्या ८० टक्क्यांवर
सुमेध वाघमारे नागपूर
आई असतानाही गेल्या १२ महिन्यात शून्य ते सहा वर्षांची ९५ निष्पाप बालके दुधाला मुकली. यात मुलींची संख्या ८० टक्क्यांहून जास्त आहे, तर शून्य ते १८ वर्षांखालील ५५६ बालके जन्मदाते हयात असतानाही अनाथ झाली आहेत. या दोन्ही वयोगटात कुमारी मातांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे बोलले जाते. या धक्कादायक आकडेवारीमुळे समाजाचे होणारे अध:पतन समोर आले आहे. स्त्रीभू्रणहत्येचा विषय देशभर गाजत आहे, तसेच अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक रस्त्यावर टाकून देण्याचे प्रमाणही कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, कुणाला रस्त्यालगत, कुणाला एस.टी. बसमध्ये, कुणाला देवळासमोर, कुणाला इस्पितळात तर कुणाला थेट अनाथलायात बेवारस सोडून पालक फरार झाले आहेत. बालकल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शून्य ते अठराच्या आतील वयोगटातील ६०७ बालके बेवारस मिळाली आहेत. यात शून्य ते सहा वयोगटातील ७६ बालके आहेत. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ५५६ बालके बेवारस मिळाली आहेत, तर शून्य ते सहा वयोगटातील ९५ बालके आहेत. या दोन्ही वर्षात ‘नकोशी’ म्हणून टाकून दिलेल्या बाळात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व मुलगी हे मुख्य कारण असल्यांचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा बाळांना हक्क प्राप्त करून देण्यासाठी बालकल्याण समिती, अनाथालये शासनाने निर्माण केली आहेत. यामुळे या अनाथ बालकांच्या समस्यांची दाहकता अजून जाणवत नसल्याचे वास्तव आहे.

कुमारी माता चिंतेचा विषय
उपासमार, सतत श्रम, हेटाळणी, तुच्छता, तिरस्कार, घरगुती हिंसा हे ज्या मुलींच्या वाट्याल येतात तिथं कुमारी माताचे प्रमाण वाढल्याचे मला दिसून आले. कारण, अशा स्थितीत कुणी प्रेमाचे दोन शब्द बोललं, भेटवस्तू दिल्या; तरी ती गोष्ट त्यांच्यासाठी अप्रूप ठरते. अन्न, अलंकार, विविध वस्तू, पैसे अशा आमिषांनी अनेक गरीब मुली स्वत:च्या शरीराचा घास पुरुषांच्या ताटात वाढतात. यातूनच कुमारी मातांचे प्रमाण वाढतेय.
-विशाखा गुप्ते
अध्यक्ष, बाल कल्याण समिती (महिला व बालविकास)


कुमारी मातांचे प्रमाण वाढतेय
बदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके असून एकूण सरासरी ८.३ टक्के आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

Web Title: 95 babies of milk were sold in 12 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.