नागपूर : सहायक प्राध्यापक पदाच्या उमेदवारांची याेग्यता निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय याेग्यता परीक्षा (सेट) येत्या १५ जून राेजी हाेणार आहे. नागपूर शहरात २२ केंद्रांवर ही परीक्षा हाेणार असून ९२८८ उमेदवारांनी नाेंदणी केली आहे. यावर्षीसुद्धा ही परीक्षा ऑफलाईनच हाेणार आहे.
सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय, पुणे द्वारे हाेणारी ही ४० वी सेट परीक्षा आहे, ज्याच्या शहरातील आयाेजनाची जबाबदारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर साेपविण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाचे परीक्षा समन्वयक डाॅ. रविन जुगादे यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षेसाठी २२ केंद्र निर्धारीत केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयाेग (युजीसी) आणि महाराष्ट्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार परीक्षेचे आयाेजन केले जाणार आहे. https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ५ जून नंतर प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील. ते या वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
डाॅ. जुगादे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सेट परीक्षेला नागपूर जिल्ह्यातून १०,८०० उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती. यावर्षी उमेदवारांची संख्या ९२८८ एवढी आहे. उमेदवारांची संख्या संपूर्ण राज्यातच कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षेत एकूण ३२ विषय
या परीक्षेसाठी उमेदवारांकडून २४ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. कला, विज्ञान, वाणिज्य, सामाजिक शास्त्र, कायदा, व्यवस्थापन, शिक्षण आणि शारीरिक शिक्षण आदी एकूण ३२ विषयांमध्ये सेट परीक्षा घेतली जाते.
परीक्षा पॅटर्न बहुपर्यायीया परीक्षेच्या दोन पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. पहिला पेपर १५ जून रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत होईल, तर दुसरा पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत होईल. पहिला पेपर १०० गुणांचा असेल तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे ओएमआर शीटवर लिहावी लागतील.