दाराची चावी बनवून कपाटातील ९० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:15+5:302020-12-26T04:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दाराची चावी बनविण्यासाठी घरी आलेल्या दोन भामट्यांनी कपाटाची चावी बनवून ९० हजार रुपये लंपास ...

90,000 lamps in the cupboard by making the key of the door | दाराची चावी बनवून कपाटातील ९० हजार लंपास

दाराची चावी बनवून कपाटातील ९० हजार लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दाराची चावी बनविण्यासाठी घरी आलेल्या दोन भामट्यांनी कपाटाची चावी बनवून ९० हजार रुपये लंपास केले. बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास लकडगंजमध्ये ही घटना घडली.

सुनील कोमचंद परमार (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दाराचे कुलूप खराब झाल्याने त्यांनी बुधवारी दुपारी चावी बनविणाऱ्या दोन जणांना घरी बोलविले. आरोपींनी चावी बनवून दिली. मात्र, ती दाराच्या कुलुपाला लागली नाही. आरोपींनी ती चावी कपाटाला लावायला सांगितली. परमार यांनी कसलाही विचार न करता ती चावी कपाटाच्या लॉकरला लावली. त्याने कपाटही उघडले नाही. त्यानंतर आरोपींनी जवळच्या चावीने परमार यांचे कपाट उघडले आणि आतमधील ९० हजारांची रोकड लंपास केली. दाराची चावी उद्या बनवून आणतो, असे सांगून आरोपी निघून गेले. त्यांनी कपाटातील रोकड चोरल्याचे लक्षात आल्यानंतर परमार यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

आठ दिवसांत दुसरी घटना

अशा प्रकारे चावीवाल्यांनी घरातील रोकड लंपास केल्याची या आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. गिट्टीखदानमध्ये चावीवाल्या चोरट्यांनी तीन लाखांची रोकड गेल्या आठवड्यात लंपास केल्याची घटना घडली होती. पोलीस त्या चोरट्यांचाही शोध घेत आहेत.

Web Title: 90,000 lamps in the cupboard by making the key of the door