९२ चे झालो तरी ‘नापास’ !
By Admin | Updated: August 4, 2015 03:05 IST2015-08-04T03:05:45+5:302015-08-04T03:05:45+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२

९२ चे झालो तरी ‘नापास’ !
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग आज कोलमडला आहे. आॅगस्ट महिना उजाडल्यावर उन्हाळी परीक्षांचे सुमारे ४० टक्के निकाल प्रलंबित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे निकालाची परीक्षेत आपण यंदा तरी उत्तीर्ण होऊ, असा संकल्प विद्यापीठ प्रशासनाने आज घ्यावा, अशी मागणी विविध स्तरावर होत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. परंतु सुरुवातीपासूनच काही ना काही अडचणी येत गेल्या. परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा पूर्णत: अभाव होता. प्रशासनाला महाविद्यालये, मूल्यांकन करणारे प्राध्यापक यांच्यावर वचक ठेवता आला नाही व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विविध अभ्यासक्रमांच्या ९५६ परीक्षांपैकी केवळ ४७० निकाल जाहीर झालेले आहेत. विद्यापीठाकडून कधी महाविद्यालये, कधी तांत्रिक बाजू सांभाळणारी कंपनीकडे बोट दाखविण्यात येत आहे.
निकाल कधी लागणार अशी विद्यार्थी विचारणा करीत असताना विद्यापीठातर्फे निकाल कधी जाहीर होणार, यासंबंधात एक वेळापत्रकच जाहीर करण्यात आले. परंतु त्याचे पालनदेखील झालेले नाही. या यादीप्रमाणे अनेक निकाल तर दोन आठवड्यांअगोदरच लागायला हवे होते.
आता परीक्षा यंत्रणा पूर्णपणे दीक्षांत समारंभाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे निकालांना आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचे ठरलेले उत्तर
४निकाल कधी लागेल अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून ठरलेलेच उत्तर देण्यात येत आहे. निकाल लवकरच जाहीर होतील, विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे सांगण्यात येत आहे. शिवाय महाविद्यालयांकडेदेखील बोट दाखविण्यात येत आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुलगुरूंचा अनुभव कुठे गेला?
४नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना निकाल वेगाने लागत होते. निकालांचा हा ‘काणे पॅटर्न’ राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला होता. आता डॉ.काणे हे स्वत:च कुलगुरू असल्याने परीक्षा प्रणालीला रुळावर आणण्यात त्यांची मौलिक भूमिका राहील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु ही अपेक्षादेखील फोल ठरली आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारून काहीच दिवस झाले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारेपर्यंत निकालांना अगोदरच उशीर झाला होता. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’चे काम करण्यातच त्यांचा जास्त वेळ जात आहे.