नागपुरातून ४० एसटींमधून ८८० मजूर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:20 IST2020-05-11T21:15:39+5:302020-05-11T21:20:40+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या.

नागपुरातून ४० एसटींमधून ८८० मजूर रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने त्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आपल्या गावाकडे पाठविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस सेवा सुरू झाली आहे. या अंतर्गत रविवारी सोडण्यात आलेल्या २५ बसेसनंतर आता सोमवारीही ४० बसेस सोडण्यात आल्या. त्यातून अडकून पडलेल्या नागरिकांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर (खवासा-देवरी चेकपोस्ट) सोडण्यात आले.
एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील ३५ बसेस गणेशपेठ बस स्थानकावरून रवाना करण्यात आल्या. तर, दोन बसेस रामटेक आणि भंडारा रोडवरील चेकपोस्टवरून रवाना करण्यात आल्या. या शिवाय, छत्तीसगडमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील २२ मजुरांनाही देवरी सीमेवरून याच बसमधून भंडारा येथे आणण्यात आले. बेलसरे म्हणाले, ही सेवा १७ मे पर्यंत सुरू राहील. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून शेल्टरहोम तसेच अन्यत्र निवाऱ्याला असणारे कामगार, विद्यार्थी, पर्यटकांची यादी महामंडळाला दिली जात आहे. या प्रभावित नागरिकांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना बस स्थानकावर शरीरिक अंतर राखून बसविले जात आहे. प्रत्येक बसमधून फक्त २२ प्रवाशांना पाठविले जात आहे.
एसटी बसची ‘ऑन दि स्पॉट’ सेवा
विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले, गणेशपेठ बस स्थानकापासून लॉकडाऊन प्रभावितांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. शहरातृून पायी जाणाऱ्या मजुरांना पारडी परिसरातील पोलीस थांबवित आहेत. त्यांना गणेशपेठ बस स्थानकावर पाठविण्याऐवजी थेट रामटेक-भंडारा रोडवर असलेल्या चेक पोस्टवरूनच त्यांच्यासाठी ‘ऑन दि स्पॉट’ बस सेवा सोमवारपासून सुरू केली आहे. या अंतर्गत सोमवारी सायंकाळी रामटेक आणि भंडारा चेक पोस्टवरून प्रत्येकी दोन बसेस ४४ मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत.