८७१ बार, दुकाने, बीअर शॉपीवर संक्रांत
By Admin | Updated: April 2, 2017 02:21 IST2017-04-02T02:21:28+5:302017-04-02T02:21:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाने केलेल्या कारवाईत नागपूर

८७१ बार, दुकाने, बीअर शॉपीवर संक्रांत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी : उत्पादन शुल्क विभागाने ठोकले सील
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाने केलेल्या कारवाईत नागपूर जिल्ह्यातील एकूण ८७१ परमिट रूम, बार, विदेशी व देशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपीला सील ठोकले. जवळपास १४ अधिकाऱ्यांसह ५० जणांच्या चमूने नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपर्यंत आणि शनिवारी दिवसभर कारवाई केली.
अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील रेस्टारंट व बार आणि दुकानांना सील लावले अर्थात केवळ दारू विक्री बंद केली. आम्ही दारू विक्रीचे परवाने रद्द केलेले नाहीत. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापुढे बार आणि दुकाने स्थानांतरित करण्याची परवानाधारकांना मोकळीस असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दारू विक्री बंद झालेले हॉटेल्स
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रॅडिसन हॉटेल, ली-मेरिडियन, प्राईड, एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट, लिजेंट, हेरिटेज वर्धा रोड, हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ, तुली इंटरनॅशनल, झिंक, सदर, अशोका रेस्टॉरंट, मोतीमहल, माऊंटरोड, व्ही५, गड्डीगोदाम, मधुशाळा रेस्टॉरंट व बार, नटराज रेस्टॉरंट व बार, ग्रॅण्ड रेस्टॉरंट व बार, टेन डाऊनिंग स्ट्रीट, गुलमर्ग डीलक्स, सीताबर्डी, सुखकर्ता, वर्धा रोड, न्यू शिवम, छत्रपती चौक, निर्मल रेस्टॉरंट व बार, देवनगर आदींसह अनेक हॉटेल्स आणि बारमध्ये दारूविक्री बंद करण्यात आली आहे.
रोजगारावर संकट
नागपूर जिल्ह्यात ८७१ बार, देशी व विदेशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपी बंद झाल्यामुळे जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लोकांवर रोजगारांचे संकट निर्माण झाले आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.