एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू
By Admin | Updated: July 10, 2015 02:40 IST2015-07-10T02:40:07+5:302015-07-10T02:40:07+5:30
राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत.

एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू
मंगेश व्यवहारे नागपूर
राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत. स्त्री-पुरुष समानतेचे पुरोगामी जग निर्माण करण्याची भाषा बोलली जात असताना, दुसरीकडे मात्र महिलांच्या आरोग्यासंदर्भात उदासिनता दिसते आहे. राज्यात एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू होत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. महाराष्ट्राची ११.५२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता, हे चित्र भयावह आहे.
मातृत्व ही स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे. प्रत्येक स्त्रीचे आई होणे एक स्वप्नच असते. गर्भधारणेपासून बाळ होईस्तव विशेष काळजी न घेतल्यास मातामृत्यूची संभावना जास्त असते. शहरी भागातील कार्यालयीन काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत गर्भधारणेनंतर काळजी घेण्याचे प्रमाण कमी आहे. खाजगी संस्थांमध्ये कार्यरत महिलांना गरोदरपणात आवश्यक असलेल्या सुट्या मिळत नाही. बैठकीचे काम करणाऱ्या, तासन्तास संगणकावर काम करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व त्रास सहन करावा लागतो. हे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येते. दरम्यान औषधोपचार, विश्रांती न घेतल्यास मातामृत्यूचा धोका संभावतो. तर ग्रामीण भागात माता मृत्यूला सामाजिक व कौटुंबिक अत्याचार ही कारणेही दिसून येतात. आरोग्य सुविधांचा अभाव, स्वत:ची काळजी न घेणे, जुन्या रुढी आणि परंपरेचा विळखा, अशिक्षितपणा, जनजागृतीचा अभाव ही कारणे ग्रामीण भागात मातामृत्यूच्या संदर्भात पुढे आली आहेत.
आधुनिक जीवनशैलीचा परिणाम
आधुनिक जीवनशैलीही मातामृत्यूला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. जंकफुडचे वाढलेले प्रमाण, कुटुंब आणि नोकरीत गुरफटलेल्या महिलांमध्ये प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात रक्तस्राव, गर्भविषबाधा, गर्भाशय फाटणे, गंभीर स्वरुपाचा रक्तक्षय, अडलेली प्रसूती, प्रसूतिनंतर होणारा जंतुदोष या गोष्टीही मातामृत्यूला कारणीभूत आहे.
असुरक्षित गर्भपात
किशोरवयीन मुलामुलींमध्ये शरीरसुखाचे वाढते आकर्षण हे महत्त्त्वाचे कारण मातामृत्यूच्या बाबतीत आढळले आहे. यावयात मुलेमुली एकमेकांच्या प्रेमात पडून शरीरसंबंध प्रस्थापित करतात. गर्भनिरोधकाचा उपयोग करण्यात येत नसल्याने, गर्भधारणा होऊन जाते. अशावेळी समाजाकडून, कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासामुळे कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता, गर्भ पाडणाऱ्या औषधांचे सेवन केले जाते. देशात गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही मातामृत्यू वाढले आहेत.
जुन्या चालीरीतींचा पगडा
लग्न आणि पहिले बाळंतपण योग्य वयात होणे आवश्यक आहे. काही समाजामध्ये जुन्या चालीरीतींचा पगडा असल्याने बालवयात लग्न होतात. मुलींमध्ये प्रजनन आरोग्याविषयी अनभिज्ञता आढळते. जनजागृतीचा अभाव असल्याने, उपलब्ध कायदे, आवश्यक माहिती नसते. योग्य वयात लग्न मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाचे महत्त्व या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने मातामृत्यू संभवतात.