नागपूर: लग्नसमारंभातील जेवणामुळे वरासह ८० जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. अमरावती रोडवरील चोकर धानी येथे घडलेल्या या घटनेबाबत कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वर्धमान नगर येथील व्यापारी कैलाश बत्रा यांच्या मुलाचे १० डिसेंबर रोजी लग्न झाले होते. बत्रा यांनी ९ डिसेंबर रोजी चोकर धानी येथे संगीत आणि १० डिसेंबर रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. बत्रा आणि त्यांचे कुटुंबीय ९ डिसेंबरपासून चोकर धानी येथेच होते. १० डिसेंबर रोजी दुपारच्या जेवणानंतर लगेच अनेकांना प्रकृतीची समस्या सुरू झाली. मात्र वातावरणामुळे झाले असे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री रिसेप्शनमध्ये जेवण करत असताना, निमंत्रितांनी जेवणाला दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.
चोकर धानी व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले नाही. रिसेप्शनमध्ये व्यस्त असल्याने बत्रा यांनाही नेमके सत्य कळू शकले नाही. रात्री १२ वाजता निमंत्रितांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ११ डिसेंबर रोजी सकाळी या घटनेची माहिती चोकर धानीचे संचालक धनराज सावलानी यांना देण्यात आली. ११ डिसेंबर रोजी दुपारी बहुतेक पाहुणे आपापल्या शहराकडे रवाना झाले. काही ट्रेनमध्ये तर काही विमानात आजारी पडले. दिल्लीला पोहोचल्यानंतर विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या मुलीला विमानतळ कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय मदत दिली. बत्रा यांच्या मुलासह कुटुंबातील ७ सदस्यदेखील आजारी पडले.
दरम्यान, लग्नासाठी आलेल्या लोकांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत स्थानिक आणि विविध शहरांमधून फोन येऊ लागले. जवळपास ८० जणांनी बत्रा यांना डॉक्टरांकडून उपचार घेतल्याचे 'प्रिस्क्रिप्शन' पाठवले. चौकशी केल्यावर, निमंत्रितांनी सांगितले की रिसेप्शन दरम्यानच काही लोकांना उलट्या झाल्या. बत्रा यांनी मंगळवारी कळमेश्वर पोलीस ठाण्यात चोकर धानीचे संचालक पार्वती लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर, जीतू मोहन सावलानी, श्याम सावलानी, मोहन सावलानी, नरेश सावलानी, सोनी सावलानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर बिघडलेले, भेसळयुक्त आणि विषारी अन्न दिल्याचा ठपका ठेवत परिसराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जेवणातून येत होता उग्र वास10 डिसेंबर रोजी रिसेप्शन दरम्यान बत्रा यांच्या इव्हेंट मॅनेजरने चोकर धानीतील मॅनेजर पवारकडे पनीरच्या भाजीमधील दुर्गंधीबद्दल तक्रार केली होती आणि ती भाजी काढून टाकण्यास सांगितले होते. यानंतरही व्यवस्थापकाने भाजी काढली नाही. आरोपींनी अधिक लोकांना जेवण दिले जात असल्याचे सांगून जादा पैसे घेतले, असा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार आल्याचे सांगत माहिती देण्याचे टाळले.