युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १ लाख ९५ हेक्टर क्षेत्रात धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात २९ जूनपर्यंत १८९.३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ७९.९ मिमी पाऊस झाला. पडलेल्या पावसाची टक्केवारी ४२.२ इतकी आहे. सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के तर गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
खरीप हंगामाला प्रारंभ झाल्यापासून सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; मात्र सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के जलसाठा असून, गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा कायम आहे. कारधा येथील इशारा व धोक्याची पातळी २४५ मीटर असून सध्या वैनगंगेत २४१.५२ मीटर पाणी पातळी आहे.
गोसे धरणातून ८० क्युमेक्स पाण्याचा विसर्गआगामी काळात पडणारा पाऊस लक्षात घेता पूर नियंत्रणासाठी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोसेखुर्द धरणातून ८० क्युमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काळजी व सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता.
धापेवाडा धरणाचे तीन दरवाजे उघडलेतिरोडा तालुक्यातील थापेवाडा धरणातून २७ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रारंभी २ गेट उघडण्यात आले. तर २९ जून रोजी तीन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत धापेवाडा धरणात २२.६९ टक्के जलसाठा असून २८९.७७ क्सुमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
१५४ गावांसाठी पावसाळा ठरतोय संकटकाळजिल्ह्यात वैनगंगा नदीकाठावर २९ गावे असून, चुलबंद ३१, बावनथडी ९, कान्हान ४, अशी १५४ गावे नदीकाठावर आहेत. तर धरण, नदी, नाल्यांमुळे प्रभावीत होणाऱ्या गावांची संख्या १३० आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने या गावांचा संकटकाळ सुरू झाला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हिताचे ठरणारे आहे. नदी, नाल्यांवरुन पुराचे पाणी वाहत असतांना रस्ता कुणीही पार करु नये.
जुलै अखेर जलसाठा वाढीची अपेक्षाहवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडल्यास जुलै महिन्याच्या अखेर जलाशये भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्यता गृहीत धरून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे.