६ महिन्यांत ७८ लाच प्रकरणे
By Admin | Updated: July 8, 2015 03:02 IST2015-07-08T03:02:01+5:302015-07-08T03:02:01+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून अधिक ‘अॅक्टिव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे.

६ महिन्यांत ७८ लाच प्रकरणे
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून अधिक ‘अॅक्टिव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षात ६ महिन्यात ७८ प्रकरणे नोंदविण्यात आली असून यात ९३ अधिकारी-कर्मचारी अडकल्याची माहिती आहे. महसूल व पोलीस खात्याचे अधिकारी सर्वात जास्त प्रमाणात या सापळ्यात अडकले आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या वर्षभरातील लाच प्रकरणांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात येते. गेल्या ६ महिन्यांत ७८ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यात पाच लाखांपेक्षा अधिक लाच रक्कम स्वीकारलेले एक प्रकरण असून, उर्वरित प्रकरणांमध्ये पाच लाखांहून कमी लाच स्वीकारण्यात आली. (प्रतिनिधी)